March 12, 2012

बांबूला काटा आला!

बांबूला काटा आला! बांबूला मुंबईत फुले आली!!

"चव्वलाच्या नादात पाणपोया ~ वाहून गेल्या"  हे रस्ते, हे रस्ते
माझा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया । विस्थापितांची मुंबई - १ 
प्रथमच सांगतो, आमच्याकडे कोकणात कोणी 'बांबूला फुले आली' असे म्हणत नाहीत. हे चक्क इंग्रजीचे भाषांतर आहे; हा केवळ सांस्कृतिक संक्रमणाचा परिणाम आहे. संस्कृती लोकांना मिळालेली सृष्टीची देणगी आहे. भाषा केवळ संस्कृतीची, पर्यायाने लोकांची अभिव्यक्ती असते, जी नैसर्गिक जैवविविधतेने घडवलेली असते. इंग्लंडला बांबू होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - २ 
सामान्य ग्रामिण जनतेला 'बांबूला काटा आला' ही बातमी म्हणजे त्यामागून येणार्‌या अवर्षणाची आकाशवाणी असते. हा एक समज आहे की वास्तविकता आहे याला मी कधीच आव्हान देणार नाही. असे वारसाने आलेले अनेक आडाखे त्यांच्यापाशी असतात.
निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - ३
बांबूला काटा आला (फुलं आली असं म्हणणं क्रौर्य आहे की अभद्र?) म्हणजे बांबूचे मरण आले. आयुष्याच्या अखेरीला आपल्या बीजांचे भरघोस पीक देऊन तो देहदान करतो. असे हे हरकामी विलक्षण वानस आहे. सारीच गवते अशी असतात. किंबहुना सर्व वानसे अशीच असतात. आपले सर्वस्व 'पर्यावरण, पारिस्थितिकी व उर्जा' यांसाठी स्वाहा करतात. पण यापरी हा, एकमेवाद्वितीय! 
फक्त नागरी बुद्धिमंत मानव आणि त्यांचे कर्तुत मात्र याला अपवाद असतील. 
बांबूचे खुंट-भांडवलशाहीचे भोगवादी सौंदर्यशास्त्र
बांबूच्या बीया उंदरांना मेजवानी असते! आणि उपासमारीनं पिडलेल्या माणसांना अन्नाचा घास!!
    बांबूचे बीज तांदळाच्या दाण्याएवढे असते. जमीनीत पडलेल्या बीजातून / बेटात बांबू पुन्हा रुजतो आणि वाढतो. त्याच्या जातीचे इतर बांबू कोठेही असले तरी त्याना एकाच वेळी काटा येतो.
    खरंच, कोणत्याही जातीच्या वेळूचे वय कोणाला सांगता येईल? कदाचित एकाद्या शेतकरी आजी-आजोबाना कुंपणातल्या बांबूचे वय आठवत असेल. किंवा आदिवासींना माहित असेल, कारण त्याना पिढ्यानपिढ्या परंपरेने ज्ञानाचा वारसा मिळतो!

॥ मुंबईत बांबूची फुले ॥ 
विस्थापितांची मुंबई - ४
या महानगराच्या महामार्गांवर मी पायी भटकताना नजरेस पडतात कैक बांबूची फुले. 
   अनेक उड्डान-पुलांखाली, फूटपाथवर, गटार-नाले-रेल्वेलायनी-महामार्ग यांच्या शेजारी... उघड्यावर आणि झोपडपट्ट्यांत (सरकारी परिभाषेत : गलिच्छ वस्ती). 
    येथे साठ लक्ष बांबूची फुले रोज फुलतात, रोज निर्माल्य होतात व पुन्हा नव्याने फुलतात. 
    हे आहेत भारताच्या औद्योगिक यंत्र-तंत्र-मंत्र या "विकासाच्या आधुनिक साधनाने" विस्थापित केलेले लोक. 

गेली पाच हजार वर्षें या जनतेने राजे-रजवाडे, संस्थानिक, सम्राट, बादशहा यांची तळी उचलून धरली. त्यांच्या आपापसांतिल वैमनस्यांत हे मृत्युमुखी पडले. 
विनामूल्य विश्राम - विस्थापितांची मुंबई - ५ 
त्यांच्या अहंकाराची स्मारके उभारण्यासाठी अनेक खर्व-निखर्व मोलाचे रक्ताच्या घामाचे पाट वाहिले.
    लोकशाहीच्या नावाने आजही तेच शोषण चालले आहे. कायद्याने ते वाजवी असेलही. पण कुठे आहे न्याय?
    आता जो विकास घडवला जातोय त्याचा लाभ कोणाला व कसा होतोय? आता लोकांना विकासातील विषमता नजरेस येत आहे. काही व्यक्ती व संस्थांच्या  सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेमुळे भ्रष्टाचाराची कुलंगडी उघडी होताहेत. पण अजून किती वर्षांची, दशकांची, शतकांची वाटचाल पुढे आहे? याचे निदान करणारा कोणीही तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्रेषित आज अस्तित्वात नाही.
    साकल्याने पाहता, या वस्तुस्थितीमुळे केवळ घृणा येते, शिसारी येते, किळस येते.
विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - १ 
केवळ मुंबईतच सुमारे साठ लक्ष, घरवाडीला मुकलेले, विस्थापित रोज अवर्षणाच्या छायेत रहातात. हे अवर्षण केवळ पाण्याचेच नाही. त्यात अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण... आले. आणि सर्वात भयानक : 'उद्या' हा शब्द त्यांच्या भाळी लिहिलेला नाही.
विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - २
सर्व देशभरच्या विस्थपितांची खात्रीलायक आकडेवारी नाही, कारण ही माणसे देशाच्या शिरगणतीत अजूनही नाहीत.
 अध्ययनाचे अध्ययन - सृष्टीची देणगी । विस्थापितांची मुंबई - ६
विकासाचे नियोजन व अंमलबजावणी यांचे "साधन आणि साध्य" कोणत्याही लोकाभिमुख राज्यात केवळ "जनता" हेच असले पाहिजेत, भांडवलशाहीचे यंत्र  मंत्र  तंत्र नव्हेत.  
हे जेव्हा साध्य होईल तेव्हाच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकासाचे संतुलन साध्य होईल. दुसरा कोणताही नियम - सिद्धांत - प्रमेय - पर्याय  युक्त नाही.
रेमीजीयस डिसोजा 
मुंबई । २१.०२.१२

टीप: वरील सर्व छायाचित्रे रेमी डिसोजा याने काढलेली आहेत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

4 comments:

  1. 'बांबूला फुले आली' यापेक्षा 'बांबूला काटा आला' हाच शब्दप्रयोग जास्त योग्य आहे - पुढे जे काही होते त्यामुळे.

    पण शहर स्वत: मात्र मरत नाहीत त्या अर्थी - ती तगून राहतात - आणि त्या प्रयत्नात अनेकांचा जीव घेतात - हे दुर्दैवच.

    ReplyDelete
  2. सावितादी, शहरे म्हणजे देशप्रदेशांवर माजलेली बांडगुळे ! शहरे जवळच्या-दूरच्या प्रदेशांवर, तेथील साधनसंपत्तीवर, ही बांडगुळे वाढतात. नगर म्हणजे केवळ नागरी समाजांतील सत्तेच्या केंद्रीकरणाचे प्रतीक. नागरी समाज म्हणजे सत्ताधारी वर्ग / वर्ण (राजा व पुरोहित) आणि प्रजा किंवा सामान्य जनता. जेवढी ही क्रेंद्रित सत्ता प्रचंड त्या प्रमाणात नगरही प्रचंड... megalopolis. ऐतहासिक महानगर अंकोरवटाचा संपूर्ण नाश हा एक उत्तम दाखला ! त्याचे शक्तिस्थान होते मर्मस्थान, त्याच्या विनाशाचे कारण ! अनेक प्रबळ नागरी समाज (Civilized Societies) इतिहासजमा झाले. जे राहिले ते विडंबन होऊन राहिले. त्याचे मुख्य कारण त्याची सृष्टीशी व सामान्य जनतेशी "भौतिक संरक्षण आणि पारमार्थिक मुक्ती"च्या नावाने केलेली प्रतारणा
    एका लेखकाने दिल्लीस Axis of Power "सत्तेचा अक्ष" म्हटले आहे ते खोटे नाही.

    ReplyDelete
  3. @aativas यानंतरच्या 'विलायतेत वेळूची वट वाडते' या व्यत्यासकथेत एक कोडं आहे. माझं शिक्षण फारसं झालेलं नाही; जेमतेम म्याट्रिक पास. नि वास्तू-विद्येचा साहित्याशी तसा फारसा संबंध नाही. त्यामुळे या कोड्याचं उत्तर मला माहित नाही.
    कृपया आपण आणि अन्य वाचकांनीपण मदत करावी ऐसे नम्र विनंती!

    ReplyDelete
  4. ॥ कवी ग्रेस आणि वेळू ॥
    (अवतरणे)
    १.
    करवंदी जाळी । वेळू फुलारला ।
    मृत्यू सामावला । ओंजळीत ॥
    (पिसे, पृष्ठ ३८)
    २.
    वेळू फुलांनी भरता
    कशी वाजणार शीळ
    (वेणी, पृष्ठ ४१)
    ३.
    वेळूत वाजे नवी बासरी
    (कवितेचा जन्म, पृष्ठ ४२)
    ४.
    तोच वेळू आडवा जुनी तशीच बासरी ...
    (नट, पृ. ७०)
    ५.
    अशा वेळू वेचणीत
    नाही सापडला पावा ...
    (देवाचा पाऊस, पृ. ७०)
    ६.
    मुरलीत हवा गोठावी
    श्वासांवर येता ताण.
    (कमाली पंथ, पृ. ९०)
    ७.
    वेळू पिचलेला
    वारा नसे जोगी;
    (तक्रारखंत! पृ. ९०)
    ८.
    बांग देणारा कबीर
    उभा वेळूत मुरारी;
    (बांग देणारा कबीर, पृ. १०१)
    ९.
    पलिकडल्या वेळूत बासरी तुडवित वारा फिरे जरी ...
    चोळीवरचा पदर जळावा ये वेळूला दचकून फूल
    (दग्ध मुलींचे संध्यागीत, पृ. १०८)
    १०.
    मी वंशबासरी होइन
    जी मध्यरात्रीला वाजे...
    (प्रश्नविनवणी, पृ. ११२)
    (ऋणनिर्देश : सांजभयाच्या साजणी । ग्रेस । पॉप्युलर । २००६)

    ReplyDelete