April 08, 2012

विलायतेत वेळूची वट वाढते

विलायतेत वेळूची वट वाढते
प्रमुख शब्द :   विलायत - पश्चिमी देश. वाढते - उंचावते, वाढते:  उदाहरण - आमच्या संस्कृतीत जेवण वाढल्याने कमी होत नाही, ते वाढते; आणि जेवल्यावर अथिती 'Thank you' म्हणत नाही, तर आशिर्वाद देतो. 'तुका देव बरें करूं' बोलायची प्रथा बाटग्या कोंकणी किरिस्तावांतपण आहे.

बीबीसी न्यूजवर जेव्हा 'Booming bamboo: The next super-material?' ही बातमी वाचली तेव्हा मी हरखून गेलो. म्हटले आज सूर्य कुठे उगवला!
पण मी जेव्हा त्या बातमीची छापिल प्रत काढून वाचली तेव्हा मला रडावे की हसावे कळेना. माझा विलायते संबंधीचा उरलासुरला भ्रमनिरास मात्र झाला.
आज लोकशाही असो की हुकुमशाही, दोन्ही दृश्य-अदृश्य भांडवलशाही सत्तेच्या मिंध्या! यांना 'अरबी-वसंता'सारखा झटका कधीतरी लागल्यावाचून या सत्ता वळणावर येणार नाहीत.

बांबूला आतापर्यंत "गरीबांचे लाकूड" - "Poor persons' timber" म्हटले जात होते. त्याचे या सत्ता व नफा यांची चटक लागलेल्या भांडवलवाद्यांनी एका रात्रीत बारसे केले : 'विसाव्या शतकाचे लाकूड' - "timber of the 21st Century".
साखरेत घोळलेल्या या नावाआड लपलेला भांडवलशाहीचा 'नवा वसाहतवाद' संपूर्ण लेखाच्या शब्दा-शब्दांत उघड दिसतो. एकविसावे शतक म्हणजे का जादूची कांडी आहे?

बीबीसीच्या बातमी पत्राची भाषा पहा. बांबूच्या उत्पादनाचे त्यांचे माप 'डॉलर' हे चलन आहे, नाही मण, नाही टन आणि नाही 'जमीन' की उत्पादक जनतेची 'जान'! हा 'डॉलर' कधी घसरेल याचा नेम नाही, आणि उत्पादक जनता उपासमारीला बळी जाईल! असे हे पाखंड!
आजच्या जाहिरातबाजीच्या युगात एक असत्य खूप वेळा पुन्हापुन्हा सांगितले की सत्य म्हणून खपवता येते, ही गोबेल्सची नीती सदाकाळ चालत नाही हेपण तेवढेच खरे. मात्र दलितांच्या ध्यानांत ते चटकन येते.

आपल्याच लोकशाही देशाचे उदाहरण घेऊ. नेहरूंची कारकीर्द ते आजपर्यंत किती महाभागांना पुढील विचार शिवला असेल : देशातील सहा लक्ष खेड्यांतील, तेव्हा ४० कोटी, आता १०० कोटी, खेडूत 'केव्हा व कसे व कधी' आपापल्या परिसरांत रस्ते, पूल, शाळा, कॉलेजं, दवाखाने, बँका, कारखाने इत्यादि सोयी स्वतः बांधतील, चालवतील व सांभाळू शकतील? की त्यांनी त्यांच्या दैवानुसार युगानुयुगे तत्कालीन मायबाप सरकारांचे कायम आश्रित होऊन राहायचे?

बांबूची आणि ग्रामीण व आदिवासी जनतेची सोबत हजारो वर्षांची पुरातन आहे. बीबीसीच्या या लेखात जर नवीन काही असेल तर बांबूचे बहुल उत्पादनासाठी भांडवल करायचा सुतोवाच. बस्स! एवढंच! बहुल उत्पादन mass production म्हणजे सत्तेचे केंद्रीकरण हे पर्यायाने आलेच की!
हवा, पाणी, पशू, पक्षी, रक्त... एवढेच काय, इतर मानवसमूहांचे दारिद्य्रपण, कोणत्याही वस्तूचे स्वार्थासाठी भांडवल करण्यात यांचा हातखंडा प्रख्यात आहे.

मितव्ययाच्या साधनाने अपव्यय करण्यात विलायत विख्यात आहे. अशी कितीक उत्पादने असतील ज्यांचे आयुष्य भाताच्या रोपाएवढेपण नसते. तेवढ्यात एकेका नमुन्याची (model) नवी सुधारलेली आवृत्ति बाजारांत येते. जुनी उत्पादने जातात मोडीत.

भाताचे रोप पन्नास दाणे तर देतेच, पण त्या वानसाचा अंशही वाया जात नाही, त्याचे जैव खत होते. आणि जेवणानंतर खरकटं उकिड्यावर किडेमुंग्या, पशूपक्षी यांच्यासाठी रवाना होते. असे हे आमचे देशी मानक (Standard). आमचे सरकार मात्र जागतिक मानकांच्या (Global Standards) सदा मागे लागलेले असते. या संदर्भात सृष्टीच्या सर्व कृतींच्या आलेखनाची मनोज्ञ व्याख्या एका पाश्चात्य शास्त्रज्ञाने केलेली आहे ती उद्धृत करतो.
 THE ATTRIBUTE TO DESIGN IN NATURE
 “In whole organisms, randomness structure is uncommon. Everything seems finely tuned by brutal rigours of natural selection. There are no spare limbs to be found and hardly any dispensable organs. This forced economy of organism design has always limited the use of bodily form as evolutionary timepiece" (Martin Jones, The Molecular Hunt, Penguin 2002).

"पैशाकडे पैसा जातो" एक म्हण आहे. हे कसं घडतं? भांडवलशाही समोर एकच उद्धिष्ठ असते : पैसा हेच 'साधन' आणि पैसा हेच 'साध्य'. जेव्हा साध्य व साधन एक होतात तेव्हा कार्य सिध्दीस जाते. लोकशाही सरकारचे 'साधन' आणि 'साध्य' जर जनता असेल तरच खरोखरीचा विकास व प्रगती साध्य होतील.

वेळू व वेळूचे बेट किंवा वेळूवन सुदृढ जमातीचे वानसांतील एक सुलक्षणी प्रतीक आहे. सर्व जीवमात्राशी याचा सलोखा आहे. गवताच्या जातींत भात, गहू इत्यादि अनेक रानटी जातींचे पुरातन काळात मानवाने गृहसंवर्धन केले. पण याचे मात्र करावे लागले नाही.
वेळू हे संतकोटीत बसणारे कालातीत eternal वानस आहे.

अत्याधुनिक उन्मत्त मानवी समाजांनी, आणि त्यांच्या देशोदेशींच्या देशी चमच्यांनी, सृष्टीपासून शिकावे तेवढे कमीच आहे.
Bamboo- Image BBC © 2012  
बांबूला हिरवं सोनं म्हटलंय : सिद्धार्थ जातकांत त्याला वैडूर्याची (cat's-eye) उपमा दिलीय.
— रेमीजीयस डिसोजा
रविवार ०८-०४-२०१२ (आज येशूच्या पुनरुत्थानाचा दिवस - कोंकणीत "इत्रूज" (Easter) म्हणतात. वेळूचे पण पुनरुत्थान होत असते. सृष्टीमातेस माझे सहस्र प्रणाम!)
--
Remigius de Souza
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

1 comment:

  1. अत्यंत गंभीर समस्या! भांडवलशाही कंपन्यांच्या या अपप्रचाराने भारताने हुरळून जायचे कारण नाही. वेळूची निर्यात करणे किंवा प्रक्रिया करणार्‌या परदेशी कारखान्यांना भारतात जागा देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे ठरेल. तृतिय, चतुर्थ आणि पंचम भारतांतील ग्रामीण, आदिवासी व विस्थापित जनतेवर आकाशीची कुर्‌हाडच कोसळेल. बाटलीबंद पाणी पिणे कोणाला परवडेल?

    ReplyDelete