April 29, 2012

एक सत्यकथा नावडतीची

एक सत्यकथा नावडतीची

महासरस्वती
शब्दचित्र, रेखाचित्र, छायाचित्र वा चलत्‌चित्र... किंवा विज्ञानातील विख्यात प्रमेय, उदा. H2O, असो; हे वास्तव नव्हे तर केवळ मायावी वास्तव असते. कलेच्या अतिवास्तव surreal अभिव्यक्तित मात्र वास्तवाचे दर्शन होते. पण आपापल्या बोधनेच्या (perception ) पातळीनुसार आपण त्यातले वास्तव जाणतो. त्यालाच आपण सत्य समजतो.

पण सत्य कधीच शब्दात पकडता येत नाही. सत्य केवळ सूचित होते; संतकवींच्या रचनांत हे बघायला मिळते. उदाहरणार्थ 'ॐ' समजायला ध्यानावाचून दुसरा मार्ग नाही, असा माझा समज आहे. (या यंत्र-तंत्र-मंत्र जमान्यात मंत्रावर ध्यान करायला कुणाला फुरसत आहे! मी मश्गुल असतो सिनेमा-टीवी-विडीयोवर नाच-गाणी बघण्यात- ऐकण्यात.)

ज्या क्षणी सत्य शब्दात पकडले असे वाटते तत्क्षणीच ते संपते; ते मग सत्य रहात नाही. त्याचा विपर्यास, विडंबन किंवा विटंबना होते. त्यातून अनर्थ. अराजक, अन्याय मात्र उद्भवतात. याचा इतिहास आजही अशा अनेक घटनांतून बघायला मिळतो. वास्तव किंवा वस्तुस्थिती सतत बदलत असते.

'जीवना'ची Life व्याख्या आतापर्यंत कोणीच करू शकले नाही. जर कोणी 'जीवन' शब्दात पकडले तर 'सत्या'प्रमाणे त्याची पण वासलात लागायची (जसे अर्वाचिन काळातील सुप्रजननशास्त्र eugenics). शब्दकोशांतील अर्थ फारच जुजबी असतात. तरीही आपण जीवन यथातथ्य जाणतो.

 आपणास जीवन समजायला पुस्तकाची गरज नाही. कारण जीवन आपल्याला स्पर्श करते. सत्यपण आपणाला असाच स्पर्श करते : "॥ सत्‌ चित्‌ आनंद ॥". पण त्याची दखल घ्यायचे आपण टाळतो, किंवा आपली हिंमत नसते, एवढंच!
---- 
ता. क. जीवन हा शब्द हल्ली खाजगी, सार्वजनिक व सडकछाप बोलीत एवढा चघळला जातो कि आता तो अश्लील वाटू लागलाय. तो आता श्रम, विश्राम, संभोग इ. अश्लील शब्दांच्या रांगेत जमा झालाय. सगुणरूप सृष्टीची ही देणगी आता विलायती बनियांच्या संसर्गाने बाजारू / बाजारबसवी झालेली आहे. आता वैद्यक, विज्ञान, व्यापार, मनोरंजन, कला... या क्षेत्रांत कोणीही 'जीवना'शी पर्यायाने सत्याशी खेळावे, प्रतारणा करावी! सुसंस्कृत नागरी समाजाने असा 'काळ' – समय / मृत्यू – आमच्यावर आणलेला आहे.
* * *
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:

Post a Comment