September 10, 2013

भग्नमूर्ती

सृष्टीयोग 

 
मातृदेवता

सुमारे तीस हजार वर्षांपुर्वीची मूर्ती, पाश्चिमात्यांनी तिला नाव दिले 'व्हिनस'. मी नाव  दिले 'मातृदेवता. आदिवासी जमातीत अजूनही योनी-पूजा अस्तित्वात आहे.

 

१. भग्नमूर्ती


कल्पना, विचार, तर्क, तर्काच्या पलिकडे... युरेकाऽऽऽ ।
वर्षांमागून वर्षें गेली, दशके गेली; एक ठिणगी अनेक घटनांच्या राखेच्या थराखाली जीवंत राहिली, उलटसुलट सतत येणार्‌या चक्रीवादळांत, झंझावातांत तगून राहिली. 


सर्जनाचा कस लागतो आपल्याच लेखी. लोकप्रवाद मागे पडतात. मळलेल्या वाटा संपतात. पुढचे मार्ग कुंठीत होतात. मागे वाळवंटे खंडारे भगदाडे पन्नास शतकांची. समोर खोल खाई मृत्युची. त्यापल्याड हिरवाई, छलांगाच्या अंतरावर.

आता माघारा फिरलास, गड्या, तर वेसण कायमची. आणि षंढाचे जीणे. कुणाचे काही जात नाही. प्राण एकवटून मार छलांग!

२. अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद)


निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति, ।
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि ।
आणिक अधिक त्याहून आहे ।
निसर्गाची जी अंतिम सीमा ।
मनुजकार्याचा आरंभ तेथे ।
तेथून विकास मानवतेचा ।
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची ।
तेंच उद्दिष्ट साधायासाठी ।
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान ।
धर्म आचार विचार आणि ।
नीतिनियम. ।
(टीप : 
हे अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच अनेक अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे. वाचकांना माहित असल्यास अवश्य कळवावे.)

' भग्नमूर्ती ' चे वरील अवतरण वाचून सुचलेले विचार :


 कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. आणि आधुनिकपण नाहीय. निसर्गाला एवढे तुच्छ लेखून कोणाचाच निभाव लागणार नाही हे नक्कीच. पश्चिमेचा प्रभाव कवीवर नक्कीच असावा!
 
प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.


आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत.
अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानवपण असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.


३. भग्नमूर्ती 


प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी - अन्न, वस्त्र, निवारा - या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले. तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.
इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.


४. 'भग्नमूर्ती'


निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !
 

एक जाणीव आकारत गेली : 'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.

५. 'भग्नमूर्ती'


भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी एक कविता : एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.
चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
दुवा :

 गायक : अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

कवी:रेमी डिसोजा 


टीप :
१. हल्लीच लिओनार्द दा विंची " कलावंत कि वैज्ञानिक ? " असा वाद विलायतेत झाला.
दुवा : Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist?
 भरल्यापोटी असे वाद घालणे हा पंडितांचा उद्योगाच आहे म्हणा ना !
२. निसर्गाची एक झलक : शरीरधर्म  BODY DHARMA
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

September 06, 2013

माहिती युग

अखंडीत चरतो, चरतो, परी विना रवंथ.
विसरतो माझी "चौथी" गरज ---
विना प्रदुषण शौच कैसे?
अरेरे! रेमीला नाही मदत, नाही गुरू, नाही दैवत!

(१९-०३-२००४)



श्री गणेश । लिंगराज मंदिर, भुवनेश्वर 

महाभारतासंबंधी एक आख्यायिका आहे. व्यास मुनी महाभारत सांगितल्या प्रमाणे लिहून घेणारया लेखकाच्या शोधात होते. श्री गणेशाचे नाव पुढे आले. श्री गणेश पण "डिक्टेशन" घ्यायला तयार झाला. पण त्याने एक अट घातली. मुनीवरानी न थांबता अखंड "डिक्टेशन" द्यायचे. व्यास मुनीनी मानले, पण त्यानी पण अट घातली, "अर्थ समजल्यावाचून पुढे लिहायचे नाही".

मूळ इंग्रजी "Information Age" या लघु कवितेचे भाषांतर.
~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 10, 2013

सृष्टी संपत्तीचे साधन

सृष्टी अंतर-बाह्य आमच्या आणि पृथ्वीच्या पार अनंत

 सृष्टी

सृष्टी संपत्तीचे साधन 


सर्व जीवमात्राच्या श्रमाने निर्माण होई संपत्ती, ।
महाभूतांच्या साह्ये जळ अन जमिनीतूनी. ॥
नाही टाकसाळीत, ना कारखान्यात, ना शेयरबाजारात; ।
तेथे होतात केवळ घडामोडी आणि उर्जेचा व्यय. ॥
* * *

रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
(२९-१०-२०१२)


टीप : 'सृष्टी' या चित्रातील पार्श्वभागातील चित्र "NASA" या संस्थेचे आहे. 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

January 21, 2013

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

Image: Source Google Images

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

आटपाट राज्य होते. तेथे गांधीबाबाने तीन माकडे सांगितली : कानांवर हात, डोळ्यांवर हात नि तोंडावर हात ! 

इंदिराबाईने एक माकड सांगितले : जननेंद्रियावर हात (असा लोकप्रवाद आहे). संततीनियमन ! त्याच्या परिणामांचा लेखाजोखा कुणी केव्हा केला? माहित नाही.

भारताची लोकशाही सरकारे याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना रयतेच्या व्यथा दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत, की त्यावर बोलतपण नाहीत.

चौथ्या धोरणात कोट्यवधी रयत विस्थापित होत आहे. (अर्थात त्यायोगे कुपोषण, उपासमार, रोगराई, आत्महत्या ! अनायासे निर्मूलन आलेच की !)

ही साठा प्रश्नांची लोककहाणी पाचा उत्तरी कुफळ संपूर्ण!


जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे. — इति रेमी डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 21, 2012

व्यक्तीच्या घडणीचे वय : जसे वळण तशी घडण

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." ही म्हण अर्धवट आहे. यात नशिबावर भिस्त ठेवल्याचा वास येतो. पालक, शिक्षक, समाज यांच्यावर मुलाच्या विकासाची काहीच का जबाबदारी नाही? पूर्वापार चालत आले ते सर्व चांगले आहे असं म्हणणे केवळ संस्कारांचा अभिनिवेश आहे एवढंच!

व्यक्तीच्या घडणीचे वय । रेमीजीयस डिसोजा, मुंबई । २००३ 

रोप झाडाच्या कुंडीत 
उष्ण कटीबंधात प्रकाश आणि ओल जगायला पुरेशी होते.

वानसेपण आपल्या वाढीसाठी प्रकाशाच्या शोधात वळण घेतात. झाडांच्या दाटीतून हरेक जण आपापली वाट शोधत जातात, कधी सरळ उंच वर वर वाढत जातात, तर कधी वाकून, प्रकाशाच्या दिशेने. काहीही भांडण तंटे वाद नाहीत. (असल्यास आपल्याला कुठे समजते त्यांची बोली?

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -१

जेथे नैसर्गिक घनदाट वने असतात, विशेषत: पर्वतराईत, असे दृश्य हमखास पाहायला मिळते. तसेच उपवनातही दिसते. शहरांतही रस्त्यालगत पाणी घालून वाढवलेली उपरी झाडे सर्रास वेडीवाकडी जात असतात.

नगरपालिकेला कोणत्या झाडांना त्यांच्या योग्य वाढीला अनुकूल "जागा आणि अवकाश" लागतात हे माहित नसावे. अरे, माणसाच्या वाढीला योग्य जागा व अवकाश" लागतात हे ज्यांना माहित नाही त्यांना वानसांचे काय सोयरसुतक? 

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -२
वानसाना  पण जगण्याची इच्छा असते.

मुंबईच्या फुटपाथवर वानसे -३
मुंबईच्या फुटपाथवर विस्थापितांच्या दोन पिढ्या जन्माला आल्या, वाढल्या आणि कोठे पोहोचल्या कोणाला माहित? नपुंसकाना कसे कळणार?

महावृक्षाच्या सावलीत दुसरी झाडे वाढत नाहीत, असा एक प्रवाद आहे. पण तो फक्त कृत्रिम लागवडीला लागू असतो. खरं तर तो महाव्यक्तिंना - माणसांना - उद्देशून आहे, वृक्षाना नव्हेच. नैसर्गिक वनात महावृक्षाच्या आधाराने असंख्यप्राणी-वनस्पती राहात असतात.
एक महावृक्ष तोडा आणि पाहा काय होते. जीवांचे जीवन उध्वस्त तर होतेच. त्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन बिघडते, भूईतील पाण्याचे साठे संपतात, जमिनीची धूप होते, वाळवंट पसरते, दुष्काळाची लागणी येते... 
पण अहंमन्य लोभी सत्ताधिशांना काय? ना खंत ना खेद! गरीब रयतेची उपासमार झाली तर ती काही मसालेदार बातमी नव्हे !

सृष्टीने संपूर्ण जीवमात्राच्या - त्यांच्या 'शरीर व मनाच्या' - पोषणाची व संरक्षणाची तरतूद त्यांच्या आलेखनात करून ठेवलेली असते. तिचा कारभार अप्पलपोट्या, सुसंस्कृत, सत्ताभिलाशी समाजासारखा थोडाच आहे! मग ते जीव जीवाणू असोत की मानवप्राणी असोत. तिथे मानवजातीच्या देवांचीपण ढवळाढवळ चालत नाही.
सृष्टी म्हणजे कथा-काव्यात गृहीत धरलेली रोमँटिक हिरवाई नव्हे. ती जशी सारी ब्रम्हांडे व्यापून आहे तशीच ती आपल्या आतही आहे. तिला, पर्यायाने आम्हालाही, आमचा शारीरिक व मानसिक विकास करायला सुयोग्य "जागा आणि अवकाश" हवे असते.
येथे 'जागे'चा अर्थ क्षेत्र, म्हणजे सरकारी नियमावलीतील चौरस फूट/मीटर क्षेत्रफळ नव्हे. आणि 'अवकाश' म्हणजे संत ज्ञानेश्वर सांगतात ते "पैस", भूमितितील त्रिमिती नव्हे. 
 

वळण - घडण याची दोन कमालीची उदाहरणे


पहिले उदाहरण आहे समष्टीचे आणि दुसरे आहे व्यक्तिचे. ही हल्लीचीच उदाहरणे सुसंस्कृत समाजाची दोन टोके आहेत.

पहिले उदाहरण : वियेतनाम देशात एक आख्खी पिढी युद्धभूमीवर जन्माला आली आणि खांद्यावर बंदूक घेवून वाढली आणि लढली. त्या युद्धात अमेरिकेला हार खावी लागली.

दुसरे उदाहरण : महाराज सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक. सयाजीरावांचे ब्रिटिश सत्तेशी संबंध कसे होते हे सर्वश्रूत आहे. त्यांचे चौफेर लोककार्य त्यांच्या भौतिक वैमवापेक्षा अधिक नजरेत भरते.
कोण होते सयाजीराव? एका सामान्य कुटुंबातून राजघराण्यात दत्तक घेतलेला मुलगा. वैभवशाली व्यक्तिला वळण नसेल तर केवळ वैभव असून काय कामाचे? सयाजीराव सर्वाथाने राजर्षी होते.

या दोन टोकात निदान एक कोटी उदाहरणे ताडून पहाणे फारच उद्बोधक ठरेल. पण अशा वेळी पुढारलेले समाज / तज्ञ नमुन्याचे सर्वेक्षण करण्यावर भागवतात. त्यांच्या बोलीत 'व्यक्ती तितक्या प्रकृति' ही म्हण नसावी. एरवी, टीवी, कंप्युटर, सेल फोन वापरणारे लोक आता एक कोटीवर पोहोचले अशा जाहिराती मात्र वेळोवेळी ऐकण्यात मात्र येतात.

तिसरे उदाहरण आहे. पण त्याचा फक्त उल्लेख येथे अनिवार्य आहे एवढ्यासाठी करतो. ते आहेत आदिवासी. भारतातल्या आणि जगभरच्या आदिम जमाती, व त्यांच्या संस्कृती ज्यांचा उगम प्रागैतिहासिक काळात आहे. बहुसंख्य लोकांना हे फारसे परिचित नाहीत.
— रेमीजीयस डिसोजा, मुंबई
~ ~ ~ ~~
© Remigius de Souza. All rights reserved.