January 26, 2010

डोंबारी:मुंबईत आपला परिसर


--------
डोंबारी : अस्तंगत होणारे कौशल्य

"डोंबारी" शब्द कित्येकांच्या कोशातून कधीच गेला असेल. काही दशकापूर्वी त्यांचे खेळ अनेकदा जुन्या मुंबईत बघायला मिळत.

वरील चित्रांत फक्त दोन मुले दिसतायत. बरोबर वडील माणूस कुणीच नाही. कुठे बरे असतील ते? की कुणी नाहीत? असतील कुठे झोपडपट्टीत, किंवा खेड्यात.
पण ही मुले त्यांचे अस्तंगत होणारे व्यायाम कौशल्य (gymnastics) घेऊन स्वावलंबी झालेले आहेत. पण ते समाजापासून, प्रशासनापासून, लोकशाही नागरिकत्वाच्या हक्कांपासून दूर फेकले गेलेले आहेत; परित्यक्त आहेत. तरीही ते स्वाभिमानाने जगण्यासाठी अतोनात प्रयत्नशील आहेत.

या शब्द-चित्रात तसेच छाया-चित्रांत आकर्षक, डोळ्याना रिझवणारे, मनोरंजक काहीच नाही. निदान नाविन्यासाठी व करमणुकीसाठी सतत हापापलेल्या पण सर्जनशीलतेच्या नावाने शून्य मनाला तर नक्कीच नाही.

या डोंबारी जमातीने आपल्या व्यायामकौशल्याने पिढ्यानपिढ्या कित्येक लक्षावधी सामान्य जनांचे रंजन केले याचा अंदाज पण कोणालाही करता येणार नाही. आता हे उणे होत चालले आहेत. आता नागरी समाजात असे खेळ वास्तवात पाहण्यापेक्षा चित्र-धनि-फितीवर -- आभासी / मायावी वास्तवतेत (संगणित्रावर / मोबाईलवर / दूरचित्रवाणीवर) -- पाहणे जास्त सोईचे वाटते. कारण अशा रंजनात पार्श्वभागी असलेले विदारक सत्य पाहावे लागत नाही.

पिढ्यानपिढ्या आपले घर --- बायका, मुले, पुरुष, जंगम पूंजी --- पाठीवर घेऊन हे लोक गावोगाव फिरत असत. यांची ही फिरती सर्कस रस्त्याच्या कडेला, उघड्या शेतात, मैदानात सुरू होत असे. येथे सर्वाना -- लहान थोराना --- विनातिकीट - विनामूल्य प्रवेश.

कोठे गेले हे लोक?

ओलिम्पिक खेळांची वर्तमानपत्राच्या कपट्यावरची चित्रे तरी या लोकानी कधी पाहीली असतील का? मग तेथे यांची वर्णी कुठून लागणार? असेच इतरही लोक आहेत.

धनुर्विद्येत निपूण असणारे भिल्ल व इतर आदीवासी. एका लांबा रामचे नाव मात्र एकदा झळकले, अपवादाने. तो अजूनही मोटारीच्या ग्यारेजात राहतो; त्याला घर देण्याचे आश्वासन अजून पुरे झाले नाही.
पोहणे व नौकानयानात निपूण असलेले कोळी, मच्छीमार व नावाडी: लक्षावधी मैल लांबीच्या समुद्रांच्या, नद्यांच्या, तळ्यांच्या किनारपट्टीला राहणारे हे लोक. यांचे जीवनच मुळी पाण्यावर असते; आणि मरणसुध्दा.

आमचे देशप्रेम / देशभक्ती क्रिकेटच्या टीमपुरतीच, का "जन-गण-मन" गायचे की "वन्दे मातरम" गायचे या वादापुरतीच राहणार का?

योग्य शिक्षण, व लोकशाही जेव्हा परित्यक्ताना स्वायत्तता देऊ शकेल, तेव्हाच आपण प्रगतीशील आहोत असे म्हणता येईल.

राजदुर्विलास

तारेवर कसरत करणारी ही बालिका -- हिला कोणते शिक्षण देणार आमचे मायबाप सरकार?
अक्षरे-अंक शिकायला हिला कितीसा वेळ लागेल? या बालिकेची कारक-क्षमता -- motor ability -- एवढी प्रगल्भ आहे की ती कोणाही तरुणास लाजवेल.

आत्ताच ती प्रशिक्षित आहे, पण तिच्या व इतर कोट्यवधी जनतेच्या शिक्षणास राजमान्यता नाही. हा दैवदुर्विलास नाही, हा "राजदुर्विलास" आहे असेच म्हणावे लागेल.

----
रेमीजीयस डिसोजा
मुंबई
प्रजासत्ताक दिन २०१०

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 21, 2010

काजवा: Firefly

रेमीजीयस डिसोजा लिखित:
काजवा
आम्ही आहोत क्षणभंगूर
पण आमचा आहे
उजेड स्वत:चा
नकोत आम्हास
प्रेषित आमच्या न्यायाचे.

----
ले. रेमीजीयस डिसोजा
(६ - ३ - १९८९)


(मालवण ते मुंबई एस टी च्या प्रवासात बस रात्रीच्या वेळी कात्रजच्या घाटात पोहचे. खाली दरीत अगणीत काजवे लखलखत. तेथे त्यावेळी चांगलीच झाडी होती. आणखी एक गोष्ट लक्षात आली ती, सह्याद्रीची झाडे जसजसे मुंबईकडे पोहोचता तसतशी विरळ होत जाते. ठिकठिकाणी उघडे बोडके डोंगर अधिकाधिक दिसतात. शिवाजी महाराजांच्या काळी किती घनदाट जंगल असेल नाही?

आम्ही फक्त इतिहासाचा जयजयकार करण्यात कुरव कहर माजवतो: ऐतहासिक समाज व निसर्ग यांची काय स्थिती होती याकडे आमचे लक्षच जात नाही.

*****
वरील लघु कवितेचे इंग्रजी स्वैर भाषांतर:



Firefly

We have a short life
but we have our own light.
We do not want
prophets of our justice.


* * *


With the woodlands and forests vanishing, with the use of chemical pesticide and insecticides in aggressive farming, the fireflies too vanish. Where would the younger generations see the firefly? Would they comprehend what a firefly is? Is it on the TV, on the internet, or in the Natural History Museums, which most unlikely?
Firefly inadvertently represents generally the peasants and particularly the tribal who are upright people.

Mumbai
[6-3-1989]

टीप: ही कविता "BEEHIVE IN GONDWANA - मधुकोष गोंडवनी" या माझ्या ब्लॉग वरून घेतली आहे.


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 16, 2010

सोन्याच्या शोधात: मुंबईत आपला परिसर

मोक्याच्या जागी सोन्याचे कण असलेली माती जमा करणे 
रस्त्यालगतची माती जमा करताना 

मी नेहमीप्रमाणे अहेतुक फिरायला निघालो होतो. वाटेत समोर दोन बाया दिसतात, एक वयस्क दूसरी तरुण, पहिलीची सून वा मुलगी असेल. दोघींच्या डोक्यावर पत्र्याची घमेली आहेत. त्यात ब्रूस वगैरे साहित्य आहे. बघताच लक्षात आले, या सोन्याच्या शोधात निघाल्या आहेत. म्हटले पाहूया यांची सोन्याची खाण कोठे आहे।हमरस्त्याने जात नाहीत. गल्ली-बोळातून त्या तरातरा चालल्या होत्या. त्याना माहित होते नक्की कोठे जायचे. त्या परिसरात मुख्यत: आता सोन्याचांदीची आधुनिक दुकाने आहेत. पण तेथे त्या जात नाहीत: आता तेथे सोनार (कारागीर) नाहीत, पक्त सोन्याचे व्यापारी आहेत.

मुख्य रस्त्याच्या मागील बाजूस जुनी वस्ती आहे, त्यात काही एक-दोन मजली जुनी घरे. त्यातील काही पाडून उंच नव्या ईमारती बांधल्या आहेत. काही ठिकाणी जुनी घरे पाडून जागा मोकळी केली आहें. त्या दोघी अशाच एका मोकळ्या जागी बैठ्या घराच्या वळचणीस थांबतात।

परंपरागत सोनाराचे घर, उद्योग व दुकान एकाच वास्तूत असतात: मागील बाजूस वा माडीवर घर आणि पुढील बाजूस दुकान. इथे करागीरांच्या पिढ्या कुटुंबाच्या कलेत लहानपणापासून शिकत पारंगत होतात.

सोने गाळण्याची प्रक्रिया 

सोने गाळण्याची प्रक्रिया 

इंडियन / भारतीय स्त्रियाना प्राचीन काळापासून दागिन्यांची फार हौस. हे चित्रशिल्पात तसेच अनेक परंपरांत पण प्रतीत होते. हर प्रकारचे दागिने, अलंकार - शिंपले, काचमणी, मौलिक दगड/रत्ने, सोने, चांदी, मोती... गाय, बैल, उंट, हत्ती, घोड़े... यानापण लोक सजवतात. घरात वापरावयाच्या वस्तू, कपडेलत्ते, घरे - झोपड़ी ते प्रासाद - मंदिरे... सर्व काही रंग-चित्र-शिल्पाने सजवले जातात.

येथल्या सूर्यप्रकाशात दागदागिने, अलंकार, आभुषणे, नक्षीकाम किती खुलून दिसतात नाही!

आणि असंख्य लोक - कोष्टी, कुंभार, सुतार, चांभार, महार, लोहार... अक्षरशत्रू असले तरी त्यांच्या "छपाई" कामात तरबेज आहेत, आजही!!
त्यांच्या कला विलायती लोकांप्रमाणे "कलेसाठी कला" नसतात, तर "जीवनासाठी कला" असतात: हेच तर भारतीय मानस!!!

त्या मुलीने दगडगोटे बाजूला करून तळहातावर माती घेतली व निरखली. तिची खात्री झाली तेव्हा जवळपासची - वळचण, रस्ता येथील - माती त्या दोघीनी घमेल्यांत भरली. काही मिनिटांतच त्या निघून गेल्या. पूर्वी तेथे सोनाराचे घर असणार यात शंकाच नाही. हे त्याना नक्कीच माहीत असणार.

ही कहाणी येथेच थांबत नाही.

मोरारजी देसाई, इंग्रजांच्या पठडीत आय. सी. एस. (नोकरशाहीचे शिक्षण) झालेला, व्याज-गांधीवादी (pseudo-Gandhian), जेव्हा केंद्र सरकारात होता तेव्हा त्याने सोने नियंत्रण कायदा (Gold Control Act) आणला. तो सत्तेवर असताना त्याने अनेक उचापती केल्या: महाराष्ट्रात (पूर्वीचा बॉम्बे प्रोविंस) दारूबंदी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध इ.

त्या कायद्याने किती कारागीर बेकार झाले असतील त्याला सुमारच नाही. कायदा करणार्र्या सरकारला त्याची तेव्हा जाणीवही नसेल. मग त्यांचे पुनर्वसन कसचे? या कयाद्यानंतर इंडियात सोन्याचा चोरटा व्यापार सुरू झाला.

आता सोन्या-चांदीचे दागिने करणारे कारखाने झालेत असे ऐकिवात आहे. पूर्वीचे स्वतन्त्र होते ते कारागीर आता नोकर झाले.
आता दागिन्यांचे "डिझाईन" करायला शिकवणारया शिक्षण संस्था सुरू झालेल्या आहेत. मग त्या विद्यार्थ्यांना सोने-चांदी-पितळ-कथील यांच्या वजनांताला फरक समजला नाही तरी चालेल!

मी लहानपणी सोने शोधणारे लोक गावाच्या बाजारपेठेत अनेकदा पाहिले होते. ते पावसाळ्यात येत. रस्त्याच्या बाजूच्या गटारातून माती काढत. पावसाळा असल्यामुळे ती माती घमेल्यात घोळवायला मुबलक पाणी असे. पुढची प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यापाशी आसिडाची बाटली पण असे.

आता हे सोने शोधणारे लोक राहतील का?

आधुनिक औद्योगिक समाजात "संगणित्रे"- "मोबाईल फोन" इ. साधने जलद टाकाऊ होतात. त्यातील सोने इ. धातू गाळण्याचे  नवे उद्योग पण सुरू होतील. एव्हाना झाले पण असतील। तेथे याना मजूरीचे काम पण मिळेल. पण अशा विषारी उद्योगात हे निरक्षर लोक कितपत टिकाव धरतील?

जे सरकार वर्षानुवर्षे विस्थापितांचे पुर्वासन करीत नाही, जेथे न्यायालयांत हजारो निवाडे थकबाकी आहेत, तेथे या मजूरांचा काय पाड? इंडियाच्या / भारताच्या शिरगणतीत पण यांचा उल्लेख असेल का शंकाच आहे.

आमच्या भाषेत एक म्हण आहे:
"नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा"
या पांचा उत्तरी ही साठा उत्तरांची "व्यत्यासकथा" (metafiction) पूरी करतो.

-------------
प्रतिमा १: भिल्ल आई व मूल




गुजराथेतील पंचमहाल जिल्ह्यात होळी उत्सवात
बिटिश राजाची चांदीची नाणी मला पहायला मिळाली. भिल्लिणीनी ती आपल्या
दागिन्यात वापरली होती. सातापुड्यातील भिल्लिणी त्यांचे मण्यांचे दागिने स्वत:च
गुंफतात. प्रत्येक दागिना वेगळा, त्याची मांडणी वेगळी व अप्रतिम.


-----

प्रतिमा ४: अठराव्या शतकातील राधेचे चित्र


टपाल विभागाने हे चित्र स्टाम्पसाठी वापरले आहे.

----------

टीप: बडोद्यात मला दोन सोनार बंधू भेटले. सोने नियंत्रण कायद्याने ते बेकार झाले होते. त्यानी बडोदे नगरापालिकेत शिपायाची नोकरी धरली. आणि शिंपिकाम शिकले ; कारागीरच ते. त्यानी घरी पूरक जोडधंदा सुरु केला. (वस्त्र ही मूलभूत गरज नाही क?)

~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 12, 2010

निवारा धेनू: मुंबईत आपला परिसर


-------

कृषीप्रधान इंडियात / भारतात बहुसंख्य (majority) जनतेचा गाईगुरें - गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, उंट इत्यादी - सर्वाथाने "निवारा आहेत. ईथेच नाहीत तर दुनियेतल्या अनेक प्रदेशांत, आजही.

"कल्पवृक्ष" जसे नारळाचे झाड, बांबू जसे "जीवनसंगीत", त्याचप्रमाणे गाय ही "कामधेनू" आहे. दृष्टा श्रीकृष्ण म्हणूनच की काय गाईच्या शेजारी उभा राहून बांसरी वाजवणारा "गोपाळ" झाला. ही श्रध्दा जगण्याच्या व्यवहारातून आली असावी.

हल्लीच्या काळात अप्पा पटवर्धन यानी सुमारें साठ वर्षांपूर्वी कोंकणातील कणकवली शहराच्या शेजारी "गोपूरी" आश्रम सूरू केला होता. तेथे त्यानी शेणापासून उर्जा (biogas) व खत करण्याचे प्रयोग केले होते.

गाय आणि भात यांचे गृहसंवर्धन (domestication) मानवाने आजच्या चीन, इंडिया इ। देशात सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी केले। त्याच दरम्यान तैग्रीस व युफ्रेटीस नद्यांच्या परिसरात शेळ्या, मेंढ्या, गहूं इत्यादींचे गृहसंवधन केले. याला कृषीक्रांती म्हणतात, जी जगभर पसरली. आधुनिक परिभाषेत या गृहसंवर्धनाच्या प्रक्रियेला "जैव प्रौद्योगिकी" (biotechnology) म्हणतात.

त्यानंतर सुमारे पांच हजार वर्षानी आली नगरे आणि नागरी समाज (civilized societies). याला संशोधकानी नागरी क्रांती (urban revolution) असे नाव दिले. हा मानवजातीवर झालेला पहिला आघात.

त्यानंतर सुमारे पांच हजार वर्षानी विलायतेत औद्योगिक क्रांती (Industrial Revolution) आली. त्याबरोबरच औद्योगिक क्रांतीचे शस्त्र घेऊन आला साम्राज्यवाद किंवा वसाहतवाद, आणि जगभर पसरला.हा केवळ मानवजातीवरच नव्हे तर सर्व जैव-अजैव सृष्टीवर झालेला दुसरा आघात.

कल्पना करुया, जर कधीकाळी इंडियात / भारतात औद्योगिक क्रांती शंभर टक्के यशस्वी झाली तर काय होईल?

समासात राहणारे ८० ते ९० कोटी लोक उपासमारीने किंवा यादवी युध्दात (दुसरे महाभारत) नेस्तनाबूद होतील; शेती करयला जमीन उरणार नाही कारण तेथे आता वाळवंट झाले असेल किंवा ती प्रदूषित झालेली असेल. उरलेले लोक अन्न आयात करतील वा प्रयोगशाळेत केलेल्या "मृदाविरहीत रासायनिक जलशेती"वर (hydroponics) जगतील.

मुंबईत पांढरपेशे भाविक, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून "गाईला चारा" देतात. ईतर शहरांतपण देत असतील. कोंकणात व ईतर ग्रामीण भागांत हा विधी मी कधी पाहिला नाही. महाराष्ट्रात पोळ्याचा सण आहे. वसूबारस - गाईंच्या वासरांची आश्विन शुध्द द्वादशीला पूजा करण्याची प्रथा आहे.

लोक गाईगुरांचे शेण घरासाठी वापरतात, इंधन म्हणून वापरतात, शेतात खतासाठी वापरतात, आणि गाईचे शेण अग्निहोत्रासाठी वापरतात.

धनगराना त्यांच्या शेळ्या आपापल्या शेतात बसवण्यासाठी शेतकरी बोलावतात. शेळ्यांच्या लेंड्या-मूत्राने शेताला खत मिळते. शेळीचे दूध आणि त्यांच्या गोठ्यात राहिल्याने क्षयी रोगी बरा होतो... लहानपणी शाळेत असताना वाचलेली "अब्बूखांकी बकरी" ही हृदयस्पर्शी गोष्ट आठवते: तीचे तात्पर्य, बकरी त्याचा "निवारा" होती.

उगाच नाही "गोधन", "पशूधन", "कामधेनू", "कल्पवृक्ष" हे शब्द देशी भाषांतून प्रचलित झाले. हे किंवा असे शब्द इंग्रजी भाषेत आहेत का मला माहीत नाही. मूलतः भाषा ही संस्कृतीच्या अनेक अभिव्यक्तिंपैकी एक आहे. आणि संस्कृती (culture) नेहमीच स्थानिक असते, जागतिक नसते. "जागतिक संस्कृती" ही कल्पना चूक असून दिशाभूल करणारी आहे. फक्त "व्यापार" जागतिक असतो.

कोणत्या देशी / परदेशी शस्त्रज्नाने पशूधनाचा आर्थिक / "पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्ज" यांच निर्देशांक शोधून काढलाय? "गाईला चारा" घालताना किती जणांच्या डोक्यांत हे विचार येतात? श्रध्दा आणि अंधश्रध्दा यामधली रेषा फार नाजूक असते. तथाकथित आधुनिक सुधारकसुध्दा अंधश्रध्देने भारलेले असतात; ते तर्काच्या अंतापर्यंत कधी जात नाहीत.

- - - - -

- - - - -
(ही व्यत्यासकथा फारच लांबली; पुरे करतो.)
* * *

टीप: शेण या विषयावर पुढील दुव्यांवर अधिक वाचा:
1. Clay–Cow dung Grain Silos of Saurashtra, Gujarat

2. Cow dung, Rice and Amartya Sen (a critique): Challenges of 21st Century

3. Collecting cow dung for Energy 3

4. Collecting cow dung for energy 2

5. Collecting cow dung for energy

6. Cow-dung for Sustenance in India

~~~~~© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape