हे रस्ते, हे रस्ते आदि अंत नसलेले
रस्ता - एक तीर काळाभुरका
छेदित अफाट माळरानाला.
पर्णहीन बाभळीच्या संतप्त छाया -
झळा तप्त बोचरया;
फुटक्या पुलावरचे पुराचे ओघ खेचणारे,
हे रस्ते, हे रस्ते कधी संपणारे.
बोडक्या सुतकी डोंगरांच्या रांगा,
मरूभूमीचे तृषार्त माळ,
त्यातून धड़पडणारे
हे रस्ते, हे रस्ते जन्माचे सांगाती.
सावलीच्या शोधात उनाची साठमारी
रेताडाच्या छताडावर मृगजळाचे स्तन,
प्रभातीच्या प्रतिक्षेत वांझोट्या रात्री,
हे रस्ते, हे रस्ते
उभ्या उभ्या चाखलेल्या रतिक्रीड़ा.
चव्वलाच्या नादात पाणपोया
वाहून गेल्या,
हे रस्ते, हे रस्ते
आयुष्याचे छेद उभे आडवे.
(गुजरात: ११-०९-१९८५)
(या कवितेची प्रतिमा १ जून २००८ रोजी BEEHIVE IN GONDWANA मधुकोष गोंडवनी या माझ्या ब्लॉग वर प्रसिध्द केली होती।)
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

No comments:
Post a Comment