May 26, 2010

घरकामाचा जिव्हाळा

एक घरगुती व्यत्यासकथा 

आमच्या आजीला व आईला त्यांच्या ऐशी वर्षांच्या आयुष्यांत कधी काळी कंटाळा आला असे झाले नसावे. त्यांच्या प्रवृत्तीत कंटाळा ही चीजच नव्हती. कुटुंब, घरकाम, शेतकाम, आणि इतर अनेक कामे वर्षभर चालतः ते सारेच घरकाम.

त्यांच्या बांधिलकीचा आवाका, मोजमाप भल्याभल्या पंडितांना - समाजसेवकांना -  शिक्षणवेत्त्यांना पण नाही. त्या शिक्षित नव्हत्या - आणि अशा कोट्यवधी आया बाया आजही आहेत. तत्त्वज्ञ, धर्मोपदेशक, शासक, प्रशासक हे वारंवार प्रवचने देतात, पण त्यांच्यावर लोकांची जबाबदारी नसते (जोवर कोणी साक्षी - पुरावे - कोर्ट - कचेऱ्या यांच्या कचाट्यात अडकत नाहीत).
  
आतासारखी करमणुकीची साधने त्याना उपलब्ध नव्हती. गावात वीज पण नव्हती. हाती चलन नसायचे. भावना, सुखदुःख, गुणावगुण सर्वाना असतात. मग त्याना हे का व कसे शक्य झाले?

मला वाटते याला कारण त्यांचा घरकामाचा स्वायत्त "जिव्हाळा"! हा जिव्हाळा येतो जबाबदारी घेतल्याने यात शंकाच नाही. बहुसंख्य अनामिक जनतेतील स्त्रीयानी उचलेला जबादरीचा वाटा पुरुष वर्गापेक्षा मोठा असतो. याची कुठेही आकडेवारी नाही. 
   

त्यांचे "घर" केवळ चौदाव्या मजाल्यावर चार / चौदा भिंतींचा गाळा नव्हे. 
त्यांचे घर म्हणजे कुटुंब, पाळलेले पक्षी,  जनावरे, परसातील झाडे झुडुपे वेली, राहते घर आणि त्यांची निगा राखणे; घराचे शेण-सारवण, लाकुडफाटा, सैपाक पाणी, शेतीभाती, शेण- पाचोळा -उकिरडा, आळीची / वाडीची सार्वजनिक सामायिक विहीर, शेजारीपाजारी, नातीगोती... सर्व काही आले. 

त्याना कधीही "आपण मोलकरीण आहो" असा विचार पण शिवला नाही, जसा आजच्या सुशिक्षित आया बायाना वाटते. मग त्याना "कंटाळा" कसा शिवणार?

 जागतिकीकरण, मुक्त व्यापार, शहरीकरण झाल्यावर आज मात्र ते चित्र पार बदलले आहे. शहरांत तर बदलले आहेच, खेडेगावांतपण बदलत आहे.
घरकामाचा जिव्हाळा कुणाही  व्यक्तीला
आजचे शिक्षण - नोकरी - व्यवसाय, आणि स्त्री स्वातंत्र्याची मोहिम देऊ शकतील का? आता शिक्षण पण व्यापार-उद्योगांची बटीक झाली आहे. आणि आजच्या आज्या - आया - सूना - मुलीना कंटाळा घेरून आहे.(बाप्प्या लोकांचे पुरुषप्रधान समाजात काय बोलणार?) 

टिप १: वरील प्रतिमा - माझी आजी जीला सारे गाव "माय" या नावाने हाक मारीत असे. माझ्या हजारो मैलांच्या भटकंतीत ती मला अनेक रुपानी नजरेस पडली, ही सत्यकथा आहे.  
२:  शेण - शेतकाम  यांच्या वरील उल्लेखाच्या संदर्भात अधिक वाचा: "Cow dung, Rice and Amartya Sen (a critique)
 ३: आजीवर कितीही लिहिले तरी थोडेच. आजीच्या निमित्ताने लिहिलेले पुढील दोन इंग्रजी पोस्ट: १ - "We must carry our own burden";  २  - "She Lived Her Living Doctrine" जरुर वाचावे. 
: खालील प्रतिमा - माझी आई जीला सारे गाव "माना" (थोरली बहिण) या नावाने हाक मारीत असे. चित्रात माझ्या घरासमोरील अंगण व परिसर: हे आहे पावसाळ्यातील दृश्य.    

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

 1. ज़ुन्या पिढीतल्या बायका फार राबत. त्यांना कमी कष्टाचे वेगळे जीवन ज़गता आले असते तर त्यांनी हा नवा पर्याय हसत स्वीकारला असता. कधी कधी तुम्ही गतकाळाचे अवास्तव उदात्तीकरण करता, असे मला वाटते. सगळ्याच स्त्रियांना काही घरकामाचा जिव्हाळा वाटत नसणार. पण अस्पृश्यांना मन्दिरात ज़ायची सोयच नव्हती तशी बायकांना घरकाम टाळायची सोयच नव्हती.

  तुम्ही पत्राद्‌वारे कळवलेला लेख मी थोडासा वाचला, आणि तो आवडला. पण त्याला मी अज़ून पुरेसा वेळ देऊ शकलेलो नाही, याबद्‌दल मी दिलगीर आहे.

  ReplyDelete
 2. आपले म्हणणे खरे आहे, पण "काळ - काम - वेग" यांचे गणित वेगवेगळ्या संस्कृतीत (cultures) बदलते असा माझा अनुभव आहे. अनेक समाजात - जमातीत, शहरात, खेड्यात व जंगलात, अनेक वर्षे मी भटकलो. तेव्हा हे माझ्या लक्षात आले. म्हणूनच म्हटले माझी आजी अन आई मला दिसल्या.
  मी पाहिले, अनुभवले ते लिहिले, माझी आवड- नावड बाजूला ठेऊन. शिवाय हा गतकाळ नाहीय. मी कोणत्याही प्रकारचे विवेचन (interpretation) केलेले नाही. दुसरा मुद्दा - कंटाळा (boredom). या विषयावर "Work - Leisure - Health - Learning - Propagation" मी इंग्रजीत मालिका लिहिलीय सवडीने पहावी, विशेषत: Leisure - विश्राम - हा लेख. यातील चार मराठी लेख या ब्लॉगवर प्रसिध्द केले आहेत.

  यावेळी व्यक्तिगत - वैयक्तिक गोष्टी लिहायच्या नाहीत - हा माझा रिवाज सोडून पन्नास वर्षांपूर्वी काढलेली दोन चित्रे मुद्दाम या लेखात जोडली.
  आपण घेतलेल्या नोंदीने आनंद झाला.

  ReplyDelete
 3. अर्थातच स्त्रीयांनी उचललेला घरकामातिल वाटा पुरुषांपेक्षा आजही जास्तच आहे. निसंकोचपणे घर, नवरा, मुलगा हेच आपले कार्यक्षेत्र समजनारी स्त्री हे एकमेव होति. आजच्या गतिमान आणि स्त्री-पुरुषसमानतेच्या जगात मुलगा सकाळीच ८.३० वाजता पाळणा घरात पोहचवला जातो तो संध्याकाळी ६ वाजताच पुन्हा घरी आणला जातो. घरकामासाठी बाइ असणे हे पुढारलेपणाचे लक्षन समजले जात आहे. आजच्या काळाचे हे काही परिनाम आहेत त्यास पर्याय नाही हे हि खरेच.. आपल्या "माय" ह्या शब्दावरून सिंधुताइ सपकाळ (माय) यांची आठवण आली, त्यांही कैक अनाथ मुलांना जिव्हाळा लावण्याची जबाबदारी माय, स्त्री म्हनून पेलली. पुरूषप्रधान संस्क्तुतीतही स्वताच्या नवऱ्याचीही आइ होण्याचा वाटा हा तिचाच असतो....

  आजी आणि आईची जपलेली आठवण नक्किच प्रेमळ आहे..

  ReplyDelete
 4. नोकरी करणारी मातापण कुटुंबाची जबाबदारी घेतेच की. तिची अवस्था दोरीवरच्या कसरतीसारखी असते. विभक्त कुटुंबात तर विचारूच नका. संयुक्त कुटुंबात फार वेगळी असते असंही नाही. मला वाटते ध्येय म्हणून केवळ आर्थिक उत्पन्नाचा विचार करून कसे चालेल? आजच्या शहरातील परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या सर्वच भागांचे संतुलन कसे ठेवायचे याचे शिक्षण कोणती संस्था -- शिक्षणसंस्था की धर्मसंस्था, सरकारी संस्था की समाजसेवी संस्था? पुरुष असो की स्त्री, बारा - पंधरा - सतरा वर्षे शिक्षण घेतल्यावर याची पण उत्तरे मार्गदार्शिकेत शोधायची का? केव्हातरी याचा स्वतंत्रपणे विचार नको का करायला? खरं सांगू का! माझ्यापुढे वर लिहिलेय त्याच्यापेक्षा प्रश्नच अधिक आहेत. धन्यवाद.

  ReplyDelete