July 06, 2010

वटपौणिमा: मुंबईत आपला परिसर


 सावित्री-सत्यवान ही पौराणिक गोष्ट सवश्रूत आहे. मन, संवेदना, जाणीव व बोधना यांची पकड घेणारी ही सर्वस्पर्शी कथा सार्वकालिक (timeless) आहे; तिला प्रशस्तीपत्रे बहाल करणारा मी  कोण?
पण माझ्या कुवतीनुसार ही कथा व परंपरा यांची काही लक्षणे ध्यानात आली ती मात्र मी इथे नमूद करतो.

सावित्री: 

स्त्रीशक्तीच्या विलक्षण सामर्थ्याचे दर्शन या कथेत होते. ही कहाणी स्त्रीमुक्तीच्या आधुनिक सुधारक जमान्यात कुठे बसते बरे? तिने आपल्या सामर्थ्याने यमाला - मृत्यूला - पण नमवले.
ही कथा किती लोकांनी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा कथा काव्यातून संपादित केली असेल? एका कवितेतील वाक्य आठवते: "सप्त पदे सख्य साधुशी घडते", सावित्री यमाला सांगते. श्री अरविंद यांनी तर इंग्रजीत महाकाव्य लिहिलेय. (मी ते वाचलेले नाही. एक तर माझे इंग्रजी जेमतेम; अन त्याची जाडी पाहून वाचायचा धीर झाला नाही.) यामुळे भारतीय स्त्रीच्या दर्जात काही फरक पडला का?


इंडिक (Indic) संस्कृतीत सामाजिक आणि/किंवा धार्मिक परंपरा --- पूजाअर्चा, विधी, उत्सव, कथा, कीर्तन, लोककला इ. अनेक अभिव्यक्तीनी साकारलेल्या आहेत.जळ, जमीन, वानसे,व प्राणी यांच्यांशी निगडीत आहेत. भूसृष्टी प्रमाणे त्या खसृष्टी व ऋतुचक्राशी पण जोडलेल्या आहेत.
परंपरा म्हणजे जिवंत इतिहास. अन स्त्रियांनी तर परंपरा, पर्यायाने संस्कृती, जपण्यास सर्व काळात व सर्व देशांत फार मदत केलेली आहे.
इंडिक संस्कृतीतील अनेक परंपरांत पर्यावरण (साकल्याने, पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा, तीनहि) पायाभूत आहे.
या परंपरा सर्वसमावेशी असल्याने साकल्याचे (holistic) द्योतक आहेत. असा हा यांचा आवाका प्रचंड आहे जो तथाकथित धर्मश्रध्देच्या पार पुढे जातो. 

ज्या काळात आजच्या सारखी सांघिक शिक्षण (mass education) नव्हते तेव्हा या परंपरा पिढ्यान पिढ्या "लोकाभिमुख लोकशिक्षणाचे साधन" झाल्या. 

वट पूजेच्या दुसर्‌या दिवशीच्या भटकंतीत रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी वडांची पूजा झालेली दिसली. तेथे निर्माल्य पडलेले होते. हे निर्माल्य कोठे जाते?
ते असंख्य जीव जीवाणूंचे अन्न असते, उरले सुरले भूमीत सामावते - अन्न ब्रम्हाच्या कारणी लागते, त्यावर वृक्षांचे पोषण होते. मुंबईत मात्र उरले सुरले अन्न गटारात किंवा शहराच्या कचऱ्यात जाते.   

सावित्रीच्या कथेत तीन पात्रे: सावित्री, सत्यवान अणि यम आहेत. तरीही सर्व पुढील पिढ्यांना वडाची कुणी महाभागाने पूजा करायला लावली. तो (किंवा अनेक) दृष्टा महापुरुष असणार. संशोधक सांगतात,  वृक्षपूजा आदिवासी - आदिम जमाती - यांच्यापासून चालू होती (दुवा: आनंद कुमारस्वामी).     

वटवृक्षाचे महात्म्य:
वड विलक्षण कणखर वृक्ष आहे. ज्या जमिनीत वाढतो तेथे पाण्याचा साठा तयार होतो व वाढतो. या झाडावर पशू पक्षी यक्ष वास करतात. हा वृक्ष हजारो वर्षें जगतो अन याचा विस्तारही विशाल होतो.

"सत्तेचे विकेंद्रीकरण"
वडाचा बहुमोल धडा
विशालकाय वडाचे टिकून राहण्याचे रहस्य आहे त्याच्या अनेक खोडांमध्ये. जसा हा वाढत जातो तशी याची पारंब्यांतून नवीन खोडेपण तयार होत जातात. आणि त्याच्या विस्ताराचा डोलारापण सांभाळतात. गुजरातेत "कबीरवट" स्थान आहे. त्याच्या सावलीत पिकनिकला जाणारे शेकडों लोक एका वेळी आसरा घेतात. माडासारखा उंच वाढला तर एवढा डोलारा घेऊन हा टिकूच शकणार नाही. 

आजचा समाज फार पुढारलेला किंवा सुधारलेला असेल. तरीही अजून लोक वडाची पूजा करतात. पण त्याच्यापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे हे पण ध्यानात घ्यायला हवे. आणि "सत्तेचे विकेंद्रीकरण" शिकणे तर आज फार अगत्याचे झालेय.

सत्ता असो, राज्य असो, संस्था असो की शहर असो, त्यांच्या वाढीबरोबर त्यांचे विकेंद्रीकरण करणे ईष्टच नव्हे तर अपरिहार्य असते, नाहीतर त्यांचे विघटन अटळ समजाच! कारण मानवी सत्तेला निसर्गाची मान्यता नाही, कधीच नव्हती. पण हे गोऱ्या चामडीच्या लोकांना कधीच समजले नाही; त्यांच्या एतद्देशीय चमच्यांना पण नाही; विज्ञानाच्या आजच्या तथाकथित विकासानंतर पण नाही! हा दैवदुर्विलास तर नाही? नाही, हा सत्ता-दुर्विलास आहे. 


सत्तेचे केंद्रीकरण 

शहर हे सत्तेचे प्रतीक आहे, अगदी इतिहास काळापासून. मग त्या सत्तेचे स्वरूप - धार्मिक, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक वा राजकिय - कोणतेही  असो. केंद्रीत सत्ता अमर्याद वाढली कि कोलमडते. ब्रिटिश साम्राज्य, सोवियट रशिया, रोम शहरातील पोपचे साम्राज्य... चेर्नोबिल ही काही याची उदाहरणे.  
लंडन, न्युयॉर्क, पारिस इ. जागतिक महानगरातील सामान्य माणसाच्या दैनंदीन जगण्याची गुणवत्ता मला माहित नाही, पण त्याबद्दल मला शंका मात्र जरूर आहेत.  
सत्तेचे केंद्रीकरण जसे वाढत जाते तसे सत्तेची बैठक जेथे असते ते शहर पण वाढते. सत्तेच्या प्रमाणात ते नगर, महानगर, जागतिक नगर (Global City) होते.

"अंकोर वट" (कंबोडिया) या बाराव्या शतकातील मंदिरासवे "अंकोर" ही हिंदू राजाच्या राजधानीचे महानगर (सुमारे १००० चौरस मीटर क्षेत्रफळ) होते. तंत्रज्ञानात ते राज्य त्यावेळी पुढारलेले होते. पण सत्तेचे अनिवार केंद्रीकरण  त्या राज्याच्या व शहराच्या विनाशाला कारणीभूत झाले. अशी कैक उदाहरणे इतिहासात आहेत. (दुवा:
http://en.wikipedia.org/wiki/Angkor)

मुंबई महानगर इथे डोळ्यासमोर आहे. येथे सामान्य जनांच्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात --- पाणी, अन्न, सांडपाणी-मैला, आरोग्य, शिक्षण इ. --- यांचे  व्यवस्थापन कोलमडले आहे. प्रचार काहीही असो. मुंबई केवळ "सूजीचे मोठेपण" मिरवते.
फक्त चांगले तेवढेच पहायचे, बाकी सर्व नजरेआड करायचे म्हणजे स्वतःशीच प्रतारणा करणे, दुसरे काय? हे खरे आपण "भोगवादी" झाल्याचे लक्षण!  

फिरंग्यांच्या संसर्गाने तथाकथित सुधारलेल्या शहरी लोकांनी  निसर्गापासून फारकत घेतली, वेगळेचार केला -- त्याला वेगळ्या खात्यात टाकले; निसर्ग केवळ भोगवस्तू झाली. विधी राहिले, अर्थ हरवले.


बाजारू व यांत्रिकी मुंबई शहराने नागरिकांचे आचार-विचार-सवयींचा ताबा घेतला, सवयी, समजुती, आचार, विचार... साचेबंद झाले, दृष्टीचा ताबा मायावी सृष्टीने /  वास्तवतेने (virtual reality) घेतला. मग "विधायक सर्जनशीलतेचे" काय झाले? विधायक असो कि विघातक असो, सर्जनशीलता समाजातील दोन टक्के लोकांच्या हाती गेली, त्यांची मक्तेदारी झाली; सत्तेसाठी व नफ्यासाठी सर्जनशीलता राबवली गेली - जाते. बाकीच्या लोकांनी फक्त "हो" ला "हो" द्यायचा.       

संधीकाळ
तरीही भल्या पहाटे कोकिळ, कावळे, साळुकी, कुकुडकोंभा इ. पक्षी साद घालतात, कुठेतरी कोंबडा आरवतो. भल्या पहाटे गांडुळे मातीत पुन्हा अदृश्य होतात. भल्या पहाटे सकाळपाळीचे लोक ४:५५  ची लोकल पकडण्यासाठी निघाले आहेत; त्याना माणसांच्या दुनियेबाहेर काय चाललेय याचे भान असते का माहित नाही.  भल्या पहाटे वारली बाया पळस, कुडा इ. पानांचे भारे घेऊन फूलबाजाराचा रस्ता तरातरा पार करतात. त्यांचे मात्र या कॉंक्रिटच्या जंगलातपण अवधान जागरूक असते.  


टिप: १. छायाचित्रे, वट पौर्णिमा १ व २ | रेमीजीयस डिसोजा. २. 'सूजीचे मोठेपण': कोकणी वाक्प्रचार, अर्थ स्पष्ट आहे.
--- रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment