August 09, 2011

मेटाफिक्शन - व्यत्यासकथा (metafiction): एक वाङमय प्रकार

व्यत्यासकथा (metafiction): एक वाङमय प्रकार
९-८-२०११ ऑगस्ट क्रांती दिन
'i'ness (self-portrait) 'मी'पण (स्व-प्रतिमा) 
  १९६७ साली खडूने चितारलेली ही स्वप्रतिमा 'i'ness graphic - 'मी'पण - शोधते,
 पण रूढ शैलीचे / प्रथेचे विडंबन करताना स्वत:शी प्रामाणिक राहते.
विज्ञानात जसे संकेत चिन्हे येतात तसे हे एक भौमितिक चिन्ह!

व्यत्यासकथा (metafiction) [टीप १] हा साहित्यप्रकार हल्लीच्या इंग्रजी साहित्यात आढळला. याची ठाम व्याख्या नाही किंवा ज्या आहेत त्या संदिग्ध आहेत. हे एक बरं झालं. ठळक अर्थ असा : यांत कथा असते जी वास्तव असते, बातमी असते पण हे बातमीपत्र नसते, समीक्षा, भाष्य असते. थोडक्यात - व्यत्यासकथा ही संकल्पना आहे, तंत्र नव्हे.

हे असते एकप्रकारे प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाणारे चित्र! किंवा शाब्दिक त्रिमिती 3D दृश्य असं पण म्हणता येईल? अथवा भारतीय पारंपरिक शैलीतील चित्राप्रमाणे, ज्यात perspective [टीप २] नसतो, पण वस्तुस्थितिच्या बाजू व तल दिसतात; हेपण त्रिमिती दृश्य असते. आणखी जवळचे उदाहरण- भारतीय कथा-कीर्तन. व्याख्येपेक्षा उदाहरण देणे अधिक बरे असे मला वाटते. व्याख्या वस्तुस्थितीला मर्यादा घालतात, कप्प्यात बसवतात. हे तर अनैसर्गिक आहे.

मी १९७५-८०  च्या दरम्यान इंग्रजी गद्य लिहायला सुरवात केली. त्यापूर्वी कोंडलेली वाफ काढण्यासाठी मराठी, कधी इंग्रजी, पद्य लिहित असे; ही माझी खात्रीची सुरक्षा झडप (वेड लागू नये म्हणून हा स्वाभाविक प्रतिकार/ईलाज असावा) होती. रेखा-रंग चित्रेपण चितारीत असें. पण ही स्वत:साठी होती. आता वाटले त्यांना ब्लॉगवर ठेवावे.

पिकासो-डोरा
हे इंग्रजी निबंध (?) मी कांही परिचित जाणकाराना वाचायला दिले तेव्हा माझे कसे हसें झाले असेल याची कोणीही कल्पना करू शकेल. एकाने सांगितले यात syntex नाही. कोणी म्हटले यात संदर्भ, प्रमाणे देऊन गृहित प्रमेय सिद्ध केलेले नाही. कोणी म्हणाले 'वेडा', कोणी म्हणाले 'कवी'; अर्थ एकच : हे गद्य लेखन कोणत्याही चाकोरीत बसत नव्हते- अजूनही नाही. शुद्धलेखनाचे तर विचारूच नका. (इंग्रजी माझी तिसरी भाषा!) एकूण सारे काही उलटेपुलटे दिसत होते, पिकासोच्या चित्रासारखे.

चारपाच वर्षांपूर्वी माझ्या ध्यानात आले, इंग्रजीत ज्याला metafiction म्हणतात ते हेच असावे. लेखन असो की चित्र असो, कच्चे मडके ठोकून थोपटून घडवावे लागतेच. तरीही साकल्याने लिहिलेल्या बहुपेडी साहित्याला कधी मान्यता मिळेल माहित नाही.

भारतीय परंपरेत 'जीवनासाठी कला' असते; 'कलेसाठी कला' ही आहे आधुनिक पाश्चिमात्य धारणा. इंडिक भाषांत 'काळ' याचे अर्थ आहेत 'समय व मृत्यू'! हे सर्वाना माहित आहे. घड्याळावर वाटप केले तरी काळ किंवा वेळ तेथेच असते. बदलतो ते आपण, आपणच निर्माण केलेला "जमाना". कारागिरी (vocation) गेली व प्रव्यवासाय (proffession) आला.  काळाच्या कप्प्यात प्रव्यवसायिक उच्चभ्रू लोक तंत्रज्ञानाच्या वेगवान पटरीवर दौड करू लागले. व्यावसायिकाना सलाम!

सर्जनशीलता काय केवळ शिल्प-चित्र-लेखन-अभिनय इ. कला निवडक वर्गाची - प्रतिभावंतांची मिरासदारी आहे? तिची उपलब्धी सर्वानाच आहे. ती नाकारणे म्हणजे निसर्गदत्त जन्मजात देणगीचा निव्वळ अवमान आहे.

अर्थात असे भेद करणे हे सत्तभिलाषी नागरी संस्कृतींचे व्यवच्छेदक लक्षण आहे, जसा वेश्या-व्यवसाय (उदा. देवदासी नृत्यांगना). कधी काळी या देशांत ६४ कला उपलब्ध होत्या, ज्या लोकाभिमुख होत्या.

ब्रिटिश-बनावटीच्या अभ्यासक्रमात चौसष्ट कला गुदमरल्या. हे आम्ही देशाभिमानी आमच्या 'मानसिक गुलामगिरी'त विसरून गेलो. 'बौद्धिक भ्रष्टाचार' हे त्याच दुसरे नांव - जो सर्वात अधिक भयानक!


या मानसिक गुलामगिरी किंवा बौद्धिक भ्रष्टाचार यावर एकच इलाज : तथाकथित सामान्य जनांनी विधायक सर्जनशीलतेची - सरस्वतीची - कांस धरणे. मग ती आराधना कोणत्याही माध्यमाने का करेनात! त्याकरिता रोजव्यवहारातील यांत्रिकीपणा काढून टाकावा लागेल. मग पुढची वाट आपोआप तयार होते, सुकर होते!

मी या निबंधाना  "व्यत्यासकथा" नांव देणे म्हणजे  कांट्याने कांटा काढण्याचा जीजुत्सू प्रकार आहे. रेमीच्या बोलीचा हा एक प्रयोग एवढेच!

टीप १. Metafiction - याला परिभाषा कोशांत पर्यायी मराठी शब्द नव्हता. तेव्हा मीच एक जुळवला, 'व्यत्यासकथा'.
टीप २. Perspective - सरकारी परिभाषा कोशात याला यथार्थदर्शन, परिदर्शन, सम्यक्‌दर्शन, त्रिमितिदर्शन हे पर्यायी शब्द दिले आहेत. याना वहिवाटीने अर्थ येईल. अशा दृश्याचे वैशिष्ठ्य असे : ज्या भागाला 'महत्व' द्यायचे तो सामोरा आणायचा, इतर मजकूर पार्श्वभागी एक, दोन किंवा तीन बिंदूंत अस्तंगत होत शून्यात जातो. असे दृश्य आधुनिक समाजातपण नजरेस पडते.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment