June 15, 2011

तांबूस मायणी काम हवे कुणा

तांबूस मायणी काम हवे कुणा? : एक व्यत्यासकथा  (metafiction)
भातशेती
मुंबईत पावसाला सुरवात झालीय. गांवाच्या - कोंकणच्या आठवणीने काळजात उमाळे येतात. आता पेरणीला सुरवात झाली असणार! शेतात काम करायला घरांत - गांवांत माणसे उणी पडणार! जो उठला तो शहरात जातो. पूर्वी हातात चलन नसायचे, पण कधी कमतरता भासली नव्हती. आता चालनावाचून पाऊल पुढे पडत नाही... असे कैक विचार मनात खळबळ उठवतात.

तांबूस (brown) मायणी (collar) काम म्हणजे शेती - कृषीकला. इलेक्ट्रोनी-माहिती-तंत्र (ET-IT) युगांत अशा कामाला कोण बरें तयार होईल? सर्वांना सफेत मायणीचें किंवा निळ्या मायणीचें काम हवें असतें, नगद पैसे देणारें काम हवें असतें. कुणाला पोटापाण्यासाठीं काम नको. बापजाद्यांनी कमाई करून ठेवलेली आहे नं! मातीचिखलांत, ऊन-हींव-पावसांत शेतीकाम कोणाला करायाचे आहे? सुधारलेल्या प्रगत जमान्यात माती अस्पृश्य झालेली आहे आणि शेतकरी नगण्य झालेले आहेत.

शेतकाम म्हणजे कृषीकला, कला व विज्ञान यांचें संयुग; जैवतंत्राचे (biotechnology) उगमस्थान; पंचमहातत्वांशीं सतत संपर्क.

"उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी"
कोणता होता तो जमाना जेव्हां "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी" ही म्हण आमच्या कानावर नेहमी यायची? त्यावेळीं आमचा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावार होता. काय स्वप्नें पाहिलीं असतील आमच्या कष्टाळू कृषीवलानीं?

आज वेगळाच प्रकार नजरेस येतोय. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्येचा मार्ग पत्करतोय, सुयोग्य शिक्षणाला वंचित राहिलाय, त्याची जमीन औद्योगिक विकासासाठी सरकार कायद्याने हिरावून घेत आहे, त्याचा संसार कुटुंब विस्थापित होत आहे. अशा लाखों विस्थापितांचे लोंढे शहरांकडे लोटलेले आहेत. नगरानगरांत महानगरांत रस्तोरस्ती हे नजरेस पडतात आणि झोपडपट्टयांतून (सरकारी परिभाषेंत त्यांना "गलिच्छ वस्ती" हें नांव आहे). त्यांच्या या वस्त्या बेकायदेशीर समजल्या जातात.


मुंबईत विस्थापित - १
 
मुंबईत विस्थापित  - २
मुंबई शहराचे पद-चिन्ह जेथे जेथे उमटले तेथून विस्थापित झालेले खेडूत 
उदरनिर्वाहाच्या शोधात येथे दाखल झाले. आता त्यांच्या आयुष्यावर नव्हे तर 
  जीवावरच या शहराने पर्यायाने लोकशाही सरकारने "कर" लावलेला आहे.
(Taxing the Life of the displaced)

आणि अडत्यांना, दलालांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत. आता नोकरदारांना पण हुद्यानुसार वरची कमाई होते असे ऐकिवात आहे.

"पांगिरा" करमुक्त चित्रपट
"पांगिरा" या नांवाचा चित्रपट हल्लींच पाहिला. करमणूक करापासून मुक्त आहे म्हणून पाहिला. विश्वास पाटिल यांच्या "झाडाझाडोरा" कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला असावा असें वाटले. पण पुस्तकाच्या नांवाचा उल्लेख चित्रपटात दिसला नाही. या कादंबरीला अनेक पारितोषकें दिलींत. आजच्या ग्रामिण परिस्थितीवर चित्रपट व कादंबरी, दोनही चांगले माहितीपट आहेत. मला वाटते हा चित्रपट ज्या प्रसंगाने संपवला आहे – पोलिसानी शेतकर्‌यांवर केलेला गोळीबार – तेथून सुरू करायला हवा होता. तसं न केल्यामुळे पटकथेची सर्जनशील निर्मितीची संधी हुकली असं मला वाटतं. मला प्रांजळपणे वाटते की कलावंताने तत्कालीन समस्यांना उत्तरे द्यायला हवीत. सरकार मात्र दानशूर आहे. तें चित्रपटाला करमुक्ती - बक्षिसे - पदके देते. पण विस्थापितांच्या जीवावर घाण पाणी वापरायचा कर लावायला मागेपुढे पहात नाही. हे इंडियाच्या आर्थिक राजधानीचे खरे स्वरूप!

या निमित्ताने मला शरच्चंद्र चटर्जींची "सव्यसाची" – पथेर दाबी – ही कादंबरी आठवते.
या कादंबरीचा शरच्चंद्र चतर्जी यांनी केलेला शेवट साधा, स्वाभाविक व विधायक सर्जनशीलतेचा नमुना आहे. कथेचा विषय आहे, भारतांत सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम. या संबंधांत पुढील परिच्छेद पुढें उद्धृत करतों.

लोकशिक्षण व साक्षरता
"... इथून पुढे खेड्याची सेवा हे माझं एकमेव व्रत. असा एक काळ होता, की या आपल्या कृषिप्रधान भारतदेशाचा खेडेगाव हाच प्राण होता. खेडेगावच त्यांचं अस्थि-मज्जा-रक्त होतं. आज ते खेडेगाव विध्वंसाच्या मार्गाला लागलं आहे. पांढरपेशे लोक खेडेगाव सोडून शहरात येतात, शहरातूनच खेडेगावावर सत्ता गाजवतात आणि तिथूनच त्यांची पिळवणूक करतात. खेडेगावाशी त्यांचा लागाबांधा असेल तर तो हाच. दुसरा कसलाच नाही. न का ठेवीनात? पण आजवर ज्या शेतकर्‌यानं त्यांना पोटाला अन्न आणि पांघारला वस्त्र दिलं, तोच शेतकरी आज अन्नाला मोताद झाला आहे. निरक्षर आहे, निरुपाय होऊन मरणाच्या पंथाला लागलाय! यापुढं मी आता त्यांच्या कल्याणासाठीच स्वतःला वाहून घेणार. भारतीनंसुद्धा या कामी मला जीव तोडून मदत करायचं कबूल केलंय. आता आम्ही गावोगाव शाळा उघडूं. जरूर पडली तर त्यांच्या घराघरातून फिरून मुलाबाळांना शिक्षण द्यायचं काम हिनं पत्करलंय. माझा संन्यास देशासाठी आहे — स्वत:साठी नव्हे डॉक्टर." (पृ. ३९९-४००)
दर वर्षी देशांत विज्ञान-शाखांत लाखो पदवीधर तयार होतात. त्यांत वनस्पतीशास्त्रज्ञ पण असतात. त्यातले बहुतेक कारकुनी करण्यात बाकीचे आयुष्य खर्च करत असावेत? त्यांनी चुकूनही टिनाच्या डब्यात माती भरून मिरची, मोहरी, हळद आलं इ. रुजत घातली असतील का शंकाच आहे. त्यांचे शिक्षण प्रयोगशाळेतच राहते.
* * *
टीप:
१. "सव्यसाची" – बंगाली नांव: पथेर दाबी – या कादंबरीला ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, ती स्वातंत्र्यानंतर उठवण्यात आली. मामा वरेरकरांनी इचे मराठी भाषांतर केले. शरच्चंद्र देशांतील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पूर्णत: जाणून होते. यात कुठही अतिरंजीत भाग नाही. कुठंही भडकपणा नाही.
२. वाचकांनी आपल्या अनुक्रिया - प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्या.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 23, 2011

वानसे जीवनदायी

हायकू

Photo: Spring 2011©  Soojung Cho, Artist, Photographer
 वानसे मूक भाषी
भरुनी काढिती
अनेकपरी माझ्या क्षती.
 
 मूळ  इंग्रजी कवितेचे (Rain, Rain, Come again-6) भाषांतर
वानसे हर प्रकारे — अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, औषधी, रंजन, शिक्षण, कागद, रंग, सुगंध, संतती किंवा संततिनियमन ... व पर्यावरण — आयुष्याच्या हरेक क्षेत्रात सतत जीवनदायी होत असतात. पण रोजच्या धावपळीच्या धबडग्यात वनसाचा क्षणभर पण विचार शिवत नाही. मग आठवडा-महिना-वर्षातून एकदा बाडबिस्तरा बांधून दृष्टीसुख घ्यायला पिकनिकला निघायचे. बॉलीवूडच्या नट-नटी बघायला जेव्हढा वेळ खर्च होतो त्याच्या शतांश-सहस्रांश पण वानसाना आपण देत नसतो.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 17, 2011

|| पंकज ||









पंक-कूपात
बिज अवतरले —
साधन – साध्य
एकवटले.


रेमीजीयस डिसोजा | मुंबई | बुद्ध पौर्णिमा १७-०५-२०११  
(मूळ इंग्रजीचे भाषांतर).
टीप:  कमळ सरस्वतीचे, बुद्धाचे आसन. भारतीय चित्रकलेत वास्तव पाणी दाखवत नाहीत, तर पाण्याचे प्रतिक म्हणून कमळ, शंख, मेघ, घट वापरतात.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमार, मुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतो. हा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape