September 30, 2010

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी

वळणावळणाने जाणारी वाट माझ्या दारी   
ओलावतो कातळ काळा मध्यान्ही    
वळून पाहशील तेव्हा  
हरवलेली वाट वळणावर  
अबोलीच्या वळेसरात,  
माडराईत, बांबूच्या बेटात,   
वळणाशी शृंगार वाऱ्याचा फुलेल,   
पायरव हरवेल आभासात.  

(सावंतवाडी - सिंधुदुर्ग.
१६ - ०५ - १९७०)  
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 23, 2010

नारळीचे नागरीकरण: आपला परिसर

नवी मुंबईला गेलो होतो. इथे बरंच काही मुंबई सारखेच आहे. फक्त जुन्या इमारती नाहीत. निवासी संकुलांची बांधकामे जोरात चालू आहेत. दहा - वीस मजली टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. इथे राहायला आलेले घर मालक हौशी आहेत. रस्त्यांच्या कडेला अरुंद फ़ूटपाथवर कुणी अशोकाची कुणी पांगारयाची  झाडे लावलीत. झाडांच्या भोवती कांक्रीटाची फरशी,.माती जवळ जवळ नहीच.   
 

रस्त्याच्या कडेस जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टीवर नारळी लावल्या आहेत. दोन झाडांमधले अंतर जेमतेम दीड - दोन वाव असेल. सुदैवाने सभोवती माती आहे - फारश्या नाहीत. ही झाडे वाढली कि त्यांची सूर्य प्रकाश मिळावा म्हणून चुरस लागेल. झावळ्या एकमेकांना आलिंगने चुंबने द्यायला लागतील. 
 




वरील दुसरे चित्र कोंकणातील सावंतवाडी येथील संमिश्र शेतीचे आहे.
 
असे सांगतात: ज्या प्रकारच्या नगरात - परिसरात लोक राहतात त्याचा त्यांच्या स्वभावावर परिणाम होतो. जमिनीपासून दूर लहान - मोठ्या चौकोनी खुराड्यात राहणाऱ्या लोकांचा स्वभाव या झाडांच्या लागवडीत (वाटल्यास त्याला उपवन म्हणा) प्रतिबिंबित झालेला दिसतो. लहान - मोठ्या गाळ्यांत राहणारी कुटुंबें उद्या वाढणार - हे सरकारला तसेच वास्तुविदाना, नागरानियोजकाना पण माहित नसते. मग येथे राहणाऱ्या कुटुंबियांना नारळीला किती जागा लागते कसं माहित असणार? ते थोड्या जमिनीला जास्तीत जास्त कसे राबवायचे याचा विचार करतात. माळ्याला तरी माहित असावे! पण तो पडला हौशी हुकुमाचा ताबेदार.  

जागेच्या स्वभावावरून एक आख्यायिका आठवली. बडोद्याला एकदा आम्ही वयोवृध्द प्राध्यापक मुजुमदार यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी या संदर्भात पुढील म्हण सांगितली.

"सुरतनी नार सुंदरी       
खंभातनी नार गोजिरी
वडोदरा नी वांकी नारी
अमदाबादी हरामजादी" 
(टीप: वांकी - चतुर, बडोद्यात बायकांचा हा गुण मात्र मी अनुभवलाय. या कवितेत सांगितलेली वैशिष्ट्ये अर्थातच काही नियम नव्हे.)
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 13, 2010

समकालीन त्रिशंकूचे गाणे

मीपण माझे कुरवाळीत असे मी निरंतर  
माझ्याच कल्पलोकात.   
अठराविश्वे  अन्नान्नगत  दारिद्र्य    
तीस कोटी माणसे मायदेशी भोगत असले तर?     
तर मला काय त्यांचे?   
ते भोगतात त्यांच्या दैवाची फळे!    

मग मी का बरे शोधतोय माझी तोंड-देखली     
जात-जमात आंतरंजालाच्या     
मायावी वास्तवाच्या प्रतिविश्वात     
महागड्या उपग्रहावर संदेश पाठवून?      
माझ्या बलवत्तर दैवाने        
एक पुष्पक विमानच का नाही खरेदी केले?    
"नशीब गांडू तर काय करी पांडू?"     

अरेऽमी असा आसामी!    
यंत्र-मंत्र-तंत्र  विधींच्या आधुनिक विश्वामित्राने    
सुखसमृद्धीचे प्रतिविश्व निर्माण करून   
द्यायची ग्वाही देऊन केला माझा त्रिशंकू!    

आणि हाडामांसाच्या, रक्ताकुडीच्या, जित्याजागत्या 
घरच्याच माणसांना लाविले की रे    
माझ्या हव्यासाने देशोधडीला!    
असा मी उर्मट उद्याम समकालीन त्रिशंकू!   

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | १०-०८-२०१० 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 04, 2010

नाच माझा आठव्या जन्मीचा

स्त्री व पुरुष सांगाड्यांची रचना 
 हे स्मशानवत भयाण काहीसे  
माझे मन ठेचाळत  
सरपटत या अंधारात  
या कवट्या कवटाळत छातीशी...   
वारा एक वेडाच फुंकर मारतो
या कनातून त्या कानातून  
मग सर्वच कवट्या शीळ घालतात   
त्यांचं विरूप संगीत  
मला पिसाळते  
छातीत धडकते  
पडघम बडवल्यासारखे   
हाडकांच्या टिपरयानी  
आवाज येतात.  

इथं अंधारात कुणाचं थडगं ठेचाळतं!  
माती...   भुसभुशीत जमीन...  मांस सडलेलं  
त्यातून दोर आतड्याचा हाती लागतो  
सात वार लांब  
मी तो तटकन तोडतो  
आत कुठंतरी असह्य कळ येते  
हे तर माझेच आतडे!  
परवाच नाही का दफन झाले! 
ही माळः  
सात जन्मीच्या सात कवट्यांची...    
आणि ही परवाची  
अजूनही सडतेय  
म्हणून हिला दर्प अहंकाराचा!  
इच्यावरचं मांस पुरतं सडून जाईल  
तेव्हा हा दर्पही नाहीसा होईल.  
तेव्हा हिच्यातून सात सूर निघू लागतील.    
 

सात जन्माच्या कवट्या गळ्रयात बांधून   
त्याच्या भेसूर संगीताबरोबर  
मी नाच करतो आठव्या जन्मीचा.  


(काही समाजांत मरणानंतर पुरण्याची प्रथा आहे. तसेच कोण पुनर्जन्म मानतात, कोणी मानीत नाहीत. येथे "मी" हा कवी आहे असे समजायचे कारण नाही. देशी कलाशास्त्रांत नवरस मानले जातात, त्यापैकी एक येथे आहे. कुणी या कवितेला अतिवास्तववादी  (surrrealist ) पण म्हणतील. लिहिताना हा विचार केला नव्हता.)   
-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 19, 2010

पर्यावरण आणि वन्य जीवन

प्रतिमा १. अतिसूक्ष्म शैवाले जी फक्त इलेक्ट्रोनि सुक्ष्मदर्शीतून दिसतात.

 सूचक शब्द: पर्यावरण अर्थात पर्यावरण, परिस्थितीकी व ऊर्जा ही तीन ही एकत्रित; वन्य जीवन अर्थात सर्व जीव सृष्टी, केवळ वाघ सिंह, इ. हिंस्र श्वापदेच नव्हेत; जैवविविधता (biodiversity )   

प्रतिमा २. प्रवाळ खडक
सोबतच्या चित्रातील प्रवाळ खडक तळहातावर राहिल एवढा, ४" x  5 " आहे. मालवणच्या सिंधूदुर्गाच्या किनारयावर असे पुष्कळ लहान मोठे प्रवाळ खडक पडलेले आहेत. हा तेथून आणला होता.
कधी हा फुलझाडाच्या कुंडीत, तर कधी घरगुती मत्स्यालयाच्या टाकीत ठेवला जातो. आता पावसाळ्यात याच्यावर शेवाळ उगवलेले आहे. सोबतीला दोन तीन रोपे उगवलेली आहेत. एक चिमुकली गोगलगाय सफर करते आहे, आणखीही जीव जिवाणू असतील. एक छोटासा परिवार!
कुंडीत नियमित पाणी घातले जाते तरी हा प्रवाळ कोरडा राहतो. माशांच्या टाकीत मात्र विरळ शेवाळ येते. पण पावसाळा सुरू झाला की मात्र याच्यावर वन्य जीवन बहरते. हा सृष्टीचा चमत्कार नाही तर काय!
शैवाले आतापर्यंत निकृष्ट वनस्पती समजली जात होती. पण आता संशोधनामुळे किती बहुउपयोगी आहे हे शास्त्रज्ञांच्या ध्यानात आलेले आहे. अन्न, नत्रयुक्त खत, ते जागतिक हवामान चक्रात शैवालांचे महत्वाचे योगदान आहे. 
प्रतिमा ३. गुलाबाची कुंडी


पर्यावरणाची काळजी करणार्‌या आमच्या सरकारने प्राथमिक शाळेच्या पहिल्या यत्तेपासून  या विषयाची पुस्तके नेमलेली आहेत. पुस्तकांसाठी टनावारी लाकूड खर्च होते. पुन्हा पुस्तके बदलली की आणखी टनावारी झाडे बळी जातात. शेवटी सुशिक्षित होऊन हे देशाचे "भविष्य" काय करणार? आणखी पंडिती पुस्तके लिहितील. हे मातीत राबणार नाहीत, झाडे लावणार नाहीत, त्यांचे संगोपन करणार नाहीत. ते काम शेतकऱ्यांचे. आम्ही फक्त आख्याने सांगणार - व्याखाने देणार.


एवढ्या टीचभर जागेत जैवविविधता (biodiversity) बघायला मिळते. तेवढ्यासाठी पण पाऊस पडायला हवा. पण वनेच  खपली तर पाऊस कुठून येणार? पुस्तके घोकून भाराभर मार्क मिळाले तर का भरघोस पाऊस पडणार की जंगलें वाढणार? कदाचित काही मोजक्याच लोकांच्या खिशात पैशाचा पाऊस पडेल. व बरचसे लोक बेकारीच्या वाळवंटात भाजून निघतील.


असे सांगतात, घडणीच्या वयात, १७-१८ वयापर्यंत मुलांचे संगोपन, अध्ययन दिशाभिमुखन होते, त्यावर त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरते. पर्यावरण काय हे झाडे, वेली, पक्षी, जनावरे, आणि सूक्ष्म शेवाळे व जीवाणू या सर्वाना समजते, अगदी नवजात अर्भकांना पण कळते. फक्त काळात नाही ते लोभी राजकारणी, सत्ताधीश, उद्योगपती, व्यापारी, व आधुनिक पुरोगामी सुधारलेल्या समाजाला; पंडित पर्यावरणाच्या नावाखाली लठ्ठ ग्रंथांचे भारे उभे करतात. मग आमचे सरकार वेडे होते आणि मुलांच्या पाठीवर बुकांचा भार  वाढत जातो.  
जसे सरकार तसे मास्तर-मास्तरणी, तसे पालक ...  या सर्वांची निसर्गापासून केव्हाच फारकत झालेली आहे. निसर्ग फक्त दृष्टीसुख घेण्यासाठी राहिला आहे. या महानगरात पर्यावरण व जैवविविधता निर्माण झालेली व त्यांचा अनुभव घ्यायला वीतभर तरी जागा कुठे आहे?


पर्यावरणाची समज सर्व जीवमात्राला - जातींना (species) उपजतच असते. ही समज संवेदनशीलतेतून, ज्ञानइंद्रियांद्वारे आणि बोधनेतून येते.  जसे धंदा व्यवसायाची समज येते तशीच पर्यावरणाची पण समज मानवाला येते. ती कमी अधिक प्रमाणात असेल.


पर्यावरण (Environment) केवळ हवामान तापमान नव्हे. परिस्थितीकी (Ecology)  व ऊर्जा (Energy) हे दोनही पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहेत. हे तीनही शरीर (व्यक्ती), कुटुंब (समाज), घर, परिसर, शहर एवढेच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व राजकीय पर्यावरण सुध्दा ते सामावतात. पण राजकारणी व हितसंबंधीयांनी या सर्वाना राजरोस बाजूला सारलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या रकान्यांत बसवलेले आहेत. 


याचे कारण साधे आहे: कारण आहे केवळ "भेदानिती" - विभाजन करा आणि सत्ता घ्या (Divide and Rule!) - हे सर्वश्रुत आहे. साम, दाम, दंड आणि भेद या चौकडीतील हि अत्यंत जालीम चौथी नीति! आजच्या आमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात या चारही नीतिंचा अमर्याद वापर होत असलेला दिसतो व अनुभवास पण येतो. कोण करतात हा वापर?

आज व्यक्तीच्या व समष्टीच्या जीवनत येनकेन प्रकारेण अनेक संस्थांचा (सरकारी, बिनसरकारी, व गैर-सरकारी संस्था / संघटना) हस्तक्षेप आपणास बघायला व अनुभवायला मिळतो. आजचा 'संघ समाज' (mass society) याला सहजपणे बळी जातो. अलीकडचेच सरकारी उदाहरण म्हणजे SEZ (special economic zone)! हे सारे सत्तेचे खेळ आहेत.या सत्तेवर अंकुश आणायचा असला तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा एकच पर्याय आहे.


हे विकेंद्रीकरण फक्त व्यक्ती व कुटुंबाच्या रूपाने समष्टी अंमलात आणू शकतील, कोणत्याही सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्था / संघटना नव्हे. असे झाले कि अनाहूतपणे सत्तेच्या केंद्रीकरणाचे - विकासाचा सोनेरी मुलामा दिलेले - पितळ उघडे पडेल. 

वीतभर जमिनीवर निर्माण होणारे "वन्य जीवन" पहिले तरी अशी क्रांती संवेदनशील बोधनेतून निर्माण होईल. सर्व दर्शने, ज्ञाने, विज्ञाने, कला... आपले अस्तित्व पण सृष्टीची  - Mother Nature - देणगी आहे. 

टीप: चित्र १, ही शैवालांची चित्रे  आंतरजालावरून घेतलेली आहेत.  शैवालांच्या ७०००० हून अधिक जाती आहेत. ही खार/गोड पाण्यात, ओलसर भिंतीवर, ओल्या लाकडावर, झाडांवर वाढतात. वेंगुर्ला, सिंधुगुर्ग येथील कृषि विद्यापिठात यांच्यावर संशोधन केले जाते.   
चित्र २ व ३ छायाचित्रे: रेमीजीयस डिसोजा.    

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape