November 07, 2009

धरतरी

धरतरी

तुझ्या अस्तित्वाचा मोहोर
सुगंध वाऱ्यावर
चंद्र तारकांच्या किरणांवर
हरवते महानगर ।


तुझ्या संगीताचा मोहोर
फुलतो आठही  प्रहर
दाही दिशा अनावर
चिरंतन समागम ।


तुझ्या आठवणीचा मोहोर
फुलतो रोमांचकारी
तीनही काळ रंध्रारंध्रावर
काळ काम वेग होतात स्थिर ।


तुझ्या हास्याचा बहर 
रानोमाळी कडेकपारीं
रेताडातून मध्यानी
सरस्वती येते वर ।


तुझ्या मौनाचा मोहोर
पुलकित सदाबहार
केसांच्या अग्रांवर
सदोदीत चमत्कार ।


चिमण्या पतंग फुलपाखरे
रंग तरंग माती धोंडे
तुझ्या अस्तित्वाचा साक्षात्कार
महाकाव्य रस्ताभर ।


तुझ्या नृत्याचा उल्लास सदाबहार
वृक्ष वेलींच्या माथ्यावर
बरसणारया ढगांवर
सुकदुकीचा सदा विसर ।


अनुभूतीचे सारे थर
पृथ्वी आकाश पाताळ
अस्तित्वाच्या पार
तुझी सय अपरंपार ।


अनादी अंत महोत्सव
आनंदाचा गजर गजर
आनंदी आनंद आनंदी आनंद
आनंदी आनंद आनंदी आनंद...

* * *
"सुकदुक" (कोंकणी), सुख दुःख
- - - - - -
स्थळ: मुंबई
काळ: २८ - ४ - १९९९
- - - - - -
धरतरी झाली माझे माता पिता गुरु.
--- रेमी डिसोजा
गुरु पौर्णिमा (१८.७.२००८)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment