November 11, 2009

आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम

धन दौलत काही सरकारी - गैरसरकारी टाकसाळीत तयार होत नाही.  वापरात असलेले चलन मुळातच मायावी धन आहे. त्याची व्यवहारातली किंमतहि मायावी असते; स्थळ - काळाच्या संदर्भात ती अधिक - उणी होते. या चढ़ - उतारात भ्रष्टाचाराचा वाटाहि काही कमी नसतो. भ्रष्टाचार सत्तेला सांगतो, "तुझे पान तेथे माझा द्रोण".  

या द्रोणाचा आकार - घनता पानापेक्षा मोठे होतात तेव्हा बलाढ्य साम्राज्ये पण डुबतात. अगदी अलीकडच्या काळातले उदाहरण द्यायचे तर आहेत ब्रिटिश साम्राज्य किंवा सोविएत रशिया. 
सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा संबंध ऐतहासिक काळापासून फार घनिष्ट आहे.   


आधुनिक काळात संगणकाचे साम्राज्य पण आता जागतिक स्तराला पोहोचलेले आहे. 
संगणकाचा विचारही डोक्यात आला की आगीच्या बंबाप्रमाणे धोक्याची घंटा चित्तात वाजू लागते; भजनाच्या नाजूक चिपळ्या नाहीत वाजत. 
संगणित्राच्या कळफलकावर टिचकी मारली कि डोक्यात घणाचे घाव आघात करतात. 


आंतरजाळ्यावरचे सर्व माहिती भांडार कुठून येते, कुठे जमा होते, कुठे जाते, आणि त्यासाठी किती ऊर्जा खर्च होते याला तर सीमाच नाही. लक्ष...कोटी... अब्ज... खर्व... निखर्व... सारी परिमाणे थिटी पडतात. 

एका संगणित्रापासून ते दुसऱ्या पर्यंत, फुकटात मिळणारी "इ-मेल" फिरते तारांच्या जाळ्यांतून, महासागराच्या तळाशी  ठेवलेल्या केबलमधून, अंतराळात फिरणार्या  अवकाशयानातून, केंद्र भांडार इ. एवढा सारा प्रवास करते. या सर्व जंजाळातील किती भाग मायावी वास्तवता निर्माण करण्यात गुंतलेला असतो याला काही सीमाच नाही. 


प्रागैताहासिक काळात मानव सर्व जगभर फिरला. वस्तुविनिमयातून इतर जमातीशी व्यवहार (व्यापार?) केला. कृषी क्रांती सर्व जगभर नेली. आजही काही जमाती अश्मयुगात जगतात.  
आजही मेधा पाताकारने एक हाक दिली की डोंगर दरयातून रानोमाळ पसरलेले आदिवासी ठरल्या दिवशी, ठरल्या जागी, ठरल्या वेळी पायी चालत येतात व एकत्र होतात. 

कागदाच्या नोटा व धातूंची नाणी आता चलन म्हणून वापरली जातात, ज्याना स्थायी मूल्य नाही. म्हणून  का सोने चांदी वापरायची? कागद - धातू - सोने - चांदी - सर्वच संपदा शेवटी पृथ्वीच्या गर्भातूनच यायची ना? 

अशी ही कथा इतिहास-पश्च मानवाच्या पुच्छ प्रगतीची; ज्याला अजून आदिम जीवानशैलीच्या दर्जाचा पर्याय गवसलेला नाही. 

अन् हे सारे लिहिताना की-बोर्डावर टिचक्या मारीत मी माझा अंहकार गोंजारतो. 



~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment