
डोंबारी : अस्तंगत होणारे कौशल्य
"डोंबारी" शब्द कित्येकांच्या कोशातून कधीच गेला असेल. काही दशकापूर्वी त्यांचे खेळ अनेकदा जुन्या मुंबईत बघायला मिळत.
वरील चित्रांत फक्त दोन मुले दिसतायत. बरोबर वडील माणूस कुणीच नाही. कुठे बरे असतील ते? की कुणी नाहीत? असतील कुठे झोपडपट्टीत, किंवा खेड्यात.
पण ही मुले त्यांचे अस्तंगत होणारे व्यायाम कौशल्य (gymnastics) घेऊन स्वावलंबी झालेले आहेत. पण ते समाजापासून, प्रशासनापासून, लोकशाही नागरिकत्वाच्या हक्कांपासून दूर फेकले गेलेले आहेत; परित्यक्त आहेत. तरीही ते स्वाभिमानाने जगण्यासाठी अतोनात प्रयत्नशील आहेत.
या शब्द-चित्रात तसेच छाया-चित्रांत आकर्षक, डोळ्याना रिझवणारे, मनोरंजक काहीच नाही. निदान नाविन्यासाठी व करमणुकीसाठी सतत हापापलेल्या पण सर्जनशीलतेच्या नावाने शून्य मनाला तर नक्कीच नाही.
या डोंबारी जमातीने आपल्या व्यायामकौशल्याने पिढ्यानपिढ्या कित्येक लक्षावधी सामान्य जनांचे रंजन केले याचा अंदाज पण कोणालाही करता येणार नाही. आता हे उणे होत चालले आहेत. आता नागरी समाजात असे खेळ वास्तवात पाहण्यापेक्षा चित्र-धनि-फितीवर -- आभासी / मायावी वास्तवतेत (संगणित्रावर / मोबाईलवर / दूरचित्रवाणीवर) -- पाहणे जास्त सोईचे वाटते. कारण अशा रंजनात पार्श्वभागी असलेले विदारक सत्य पाहावे लागत नाही.
पिढ्यानपिढ्या आपले घर --- बायका, मुले, पुरुष, जंगम पूंजी --- पाठीवर घेऊन हे लोक गावोगाव फिरत असत. यांची ही फिरती सर्कस रस्त्याच्या कडेला, उघड्या शेतात, मैदानात सुरू होत असे. येथे सर्वाना -- लहान थोराना --- विनातिकीट - विनामूल्य प्रवेश.
कोठे गेले हे लोक?
ओलिम्पिक खेळांची वर्तमानपत्राच्या कपट्यावरची चित्रे तरी या लोकानी कधी पाहीली असतील का? मग तेथे यांची वर्णी कुठून लागणार? असेच इतरही लोक आहेत.
धनुर्विद्येत निपूण असणारे भिल्ल व इतर आदीवासी. एका लांबा रामचे नाव मात्र एकदा झळकले, अपवादाने. तो अजूनही मोटारीच्या ग्यारेजात राहतो; त्याला घर देण्याचे आश्वासन अजून पुरे झाले नाही.
पोहणे व नौकानयानात निपूण असलेले कोळी, मच्छीमार व नावाडी: लक्षावधी मैल लांबीच्या समुद्रांच्या, नद्यांच्या, तळ्यांच्या किनारपट्टीला राहणारे हे लोक. यांचे जीवनच मुळी पाण्यावर असते; आणि मरणसुध्दा.
आमचे देशप्रेम / देशभक्ती क्रिकेटच्या टीमपुरतीच, का "जन-गण-मन" गायचे की "वन्दे मातरम" गायचे या वादापुरतीच राहणार का?
योग्य शिक्षण, व लोकशाही जेव्हा परित्यक्ताना स्वायत्तता देऊ शकेल, तेव्हाच आपण प्रगतीशील आहोत असे म्हणता येईल.
राजदुर्विलास
तारेवर कसरत करणारी ही बालिका -- हिला कोणते शिक्षण देणार आमचे मायबाप सरकार?
अक्षरे-अंक शिकायला हिला कितीसा वेळ लागेल? या बालिकेची कारक-क्षमता -- motor ability -- एवढी प्रगल्भ आहे की ती कोणाही तरुणास लाजवेल.
आत्ताच ती प्रशिक्षित आहे, पण तिच्या व इतर कोट्यवधी जनतेच्या शिक्षणास राजमान्यता नाही. हा दैवदुर्विलास नाही, हा "राजदुर्विलास" आहे असेच म्हणावे लागेल.
----
रेमीजीयस डिसोजा
मुंबई
प्रजासत्ताक दिन २०१०
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
आपले छायाचित्राधारित लेख खरोखर मनाला टोचनी लावून जातात, मनात असंतोष पैदा करून जातात... आपन, भारत खरोखरच महासत्ता बनण्याच्या "लायकीचा" झाला आहे काय या शंकेची उत्पती करून जातात..
ReplyDeleteआनी दुसऱ्या बाजुला मुंबइ सारख्या माया-नगरीत हे सारं अजुनही जिवंत आहे ह्याच समाधानही वातते आहे..
सचिन,
ReplyDeleteतुम्ही माझ्या मनातलं बोललात.
माझ्या समोर प्रश्नच प्रश्न संतत उभे राहतात. मी माझ्या परीनं त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा पण प्रयत्न करतो. आर्किटेक्ट - प्लानर चा काही वर्षे व्यवसाय केला असल्याने अनेक गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. आणि मी "जीवनासाठी कला" मानतो; मग ती कोणतीही अभिजात कला असो: साहित्य - दृश्य कला - प्रयोगानिष्ट कला असोत. "डो-को-मो' ची मला अलर्जी आहे.
काही प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने देतो. पण लक्षात कोण घेतो?
धन्यवाद,
---रेमी
म्हणतात ना की, "एखाद्याचे नशीब असायला हवं!" हो! मी स्वत:ला भाग्यवान समजतो कि, आज पुणे शहरात राहुनही माझ्या मुलाला डोंबारी, वासुदेव, अंगावर चाबकाचे फटके मारून घेणारा पोतराज या लोकांची ओळख आहे... खरेच जर या मातीत जन्मलो नसतो तर हे मराठी वैभव पहायला मिळाले नसते!!...
ReplyDeleteप्रथम: आपला 'ब्लॉग' मला वैशिष्ट्यपूर्ण वाटला. आणि उपयुक्त.
ReplyDeleteआपल्या नोंदी बद्दल आभारी. मला पण या मातीचा अभिमान वाटतो: वाटते पुनर्जन्म ही चीज असेल तर मला या मातीतच जन्म मिळो. कृपा करून पुन्हा या.माझ्या ब्लॉग वरची पोस्ट विशेष करून पुढच्या पिढ्याना उद्देशून आहेत.