November 24, 2009

नागरता (civilization) इंडियावर मराठी लघुकविता

नागरता किंवा नागर-संस्कृती (civilization) ही लघु कविता इंडियाला उद्देशून आहे. ती सर्व जगाला पण लागू होऊ शकते.
- - -


- - -

आमची देशभक्ति केवळ तळ हातावर मावेल एवढ्या नकाशापुरती नाही. ती ज़मीन, पाणी व माणसा सह समस्त जीवमात्राला सामावते.

उदे उदे करतो आम्ही "पर्यावरण (environment) + पारिस्थितिकी (ecology) + ऊर्जा (energy)" यांचा निसर्गाने दिलेला अतिप्राचीन, अलिखित मूल धर्मं नियम, जो मानव-निर्मित सर्व वस्तू आणि कल्पना-संकल्पना यापेक्षाही सर्वश्रेष्ट आहे, मग ते कला आणि शास्त्रे, धर्म आणि तत्वज्ञाने असोत.

आम्हास जाणीव आहे, नागरतेने वेळोवेळी निर्माण केलेल्या भौतिक / ऐहिक सीमा बदलाच्या अधीन आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या इतिहास काळापासून जमीन व पाणी यांच्या प्राकृतिक सीमा पण संतत बदलत असतात.

टीप:

ही कविता मूळ इंग्रजी "Civilization" या कवितेचे भाषांतर आहे. काही सेवाभावी संस्थानी "राष्ट्रीय एकत्माते" साठी गांधी जयन्ती २००० दिवशी मुंबईत मिरवणूक, व ती "आगस्ट क्रांति उद्यान" येथे सार्वजनिक सभेत परिवर्तित झाली. त्या घटनेत सामिल होण्यासाठी जाताना लोकल ट्रेनमध्ये मूळ इंग्रजी कविता मी लिहिली होती.

ही प्रसिध्द करावयास गांधी जयंतीच्या दिवसाची वाट पहायची मला गरज वाटत नाही.


रेमी डिसोजा
मुंबई

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 16, 2009

चुकतात माझी गणिते केवळ



 घड्याळाचे  जागतिक महाभारत


लेखक: रेमीजीयस डिसोजा 


नेमेची सूर्योदय रोज पाहता
चुकुनच कधी येई ध्यानी
माझ्या विचारांच्या गतीहुनी
अफाट आहे धरतीची गती
नि
सूर्य रोजच्या रोज जागा बदलतो,
उगवायची वेळ बदलतो, ऋतु बदलतो,
कधी रात्र मोठी कधी दिवस,
वारयाची दिशा बदलतो;
नि
मी मात्र असतो जागच्या जागी
धावता धावता अधांतरी फिरत्या
प्रचंड चक्राच्या परिघावर वेगाने.
तरीही रोजच्या रोज सूर्य सांगे,
बा रेमी,
ही तुझी घड्याळाची टिक टिक
जळवेसारखी चिकटलेली तुला
आहे एक हुलकावणी देणारी
वादग्रस्त संकल्पना केवळ.
नि
कितीही आटापिटा केला तरी
चुकत नाही काळ; परी
लिहिलेली एक रेषेवर सरळ
चुकतात माझी गणिते केवळ
नेमेची.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 11, 2009

आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम

धन दौलत काही सरकारी - गैरसरकारी टाकसाळीत तयार होत नाही.  वापरात असलेले चलन मुळातच मायावी धन आहे. त्याची व्यवहारातली किंमतहि मायावी असते; स्थळ - काळाच्या संदर्भात ती अधिक - उणी होते. या चढ़ - उतारात भ्रष्टाचाराचा वाटाहि काही कमी नसतो. भ्रष्टाचार सत्तेला सांगतो, "तुझे पान तेथे माझा द्रोण".  

या द्रोणाचा आकार - घनता पानापेक्षा मोठे होतात तेव्हा बलाढ्य साम्राज्ये पण डुबतात. अगदी अलीकडच्या काळातले उदाहरण द्यायचे तर आहेत ब्रिटिश साम्राज्य किंवा सोविएत रशिया. 
सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा संबंध ऐतहासिक काळापासून फार घनिष्ट आहे.   


आधुनिक काळात संगणकाचे साम्राज्य पण आता जागतिक स्तराला पोहोचलेले आहे. 
संगणकाचा विचारही डोक्यात आला की आगीच्या बंबाप्रमाणे धोक्याची घंटा चित्तात वाजू लागते; भजनाच्या नाजूक चिपळ्या नाहीत वाजत. 
संगणित्राच्या कळफलकावर टिचकी मारली कि डोक्यात घणाचे घाव आघात करतात. 


आंतरजाळ्यावरचे सर्व माहिती भांडार कुठून येते, कुठे जमा होते, कुठे जाते, आणि त्यासाठी किती ऊर्जा खर्च होते याला तर सीमाच नाही. लक्ष...कोटी... अब्ज... खर्व... निखर्व... सारी परिमाणे थिटी पडतात. 

एका संगणित्रापासून ते दुसऱ्या पर्यंत, फुकटात मिळणारी "इ-मेल" फिरते तारांच्या जाळ्यांतून, महासागराच्या तळाशी  ठेवलेल्या केबलमधून, अंतराळात फिरणार्या  अवकाशयानातून, केंद्र भांडार इ. एवढा सारा प्रवास करते. या सर्व जंजाळातील किती भाग मायावी वास्तवता निर्माण करण्यात गुंतलेला असतो याला काही सीमाच नाही. 


प्रागैताहासिक काळात मानव सर्व जगभर फिरला. वस्तुविनिमयातून इतर जमातीशी व्यवहार (व्यापार?) केला. कृषी क्रांती सर्व जगभर नेली. आजही काही जमाती अश्मयुगात जगतात.  
आजही मेधा पाताकारने एक हाक दिली की डोंगर दरयातून रानोमाळ पसरलेले आदिवासी ठरल्या दिवशी, ठरल्या जागी, ठरल्या वेळी पायी चालत येतात व एकत्र होतात. 

कागदाच्या नोटा व धातूंची नाणी आता चलन म्हणून वापरली जातात, ज्याना स्थायी मूल्य नाही. म्हणून  का सोने चांदी वापरायची? कागद - धातू - सोने - चांदी - सर्वच संपदा शेवटी पृथ्वीच्या गर्भातूनच यायची ना? 

अशी ही कथा इतिहास-पश्च मानवाच्या पुच्छ प्रगतीची; ज्याला अजून आदिम जीवानशैलीच्या दर्जाचा पर्याय गवसलेला नाही. 

अन् हे सारे लिहिताना की-बोर्डावर टिचक्या मारीत मी माझा अंहकार गोंजारतो. 



~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 07, 2009

धरतरी

धरतरी

तुझ्या अस्तित्वाचा मोहोर
सुगंध वाऱ्यावर
चंद्र तारकांच्या किरणांवर
हरवते महानगर


तुझ्या संगीताचा मोहोर
फुलतो आठही  प्रहर
दाही दिशा अनावर
चिरंतन समागम


तुझ्या आठवणीचा मोहोर
फुलतो रोमांचकारी
तीनही काळ रंध्रारंध्रावर
काळ काम वेग होतात स्थिर


तुझ्या हास्याचा बहर 
रानोमाळी कडेकपारीं
रेताडातून मध्यानी
सरस्वती येते वर


तुझ्या मौनाचा मोहोर
पुलकित सदाबहार
केसांच्या अग्रांवर
सदोदीत चमत्कार


चिमण्या पतंग फुलपाखरे
रंग तरंग माती धोंडे
तुझ्या अस्तित्वाचा साक्षात्कार
महाकाव्य रस्ताभर


तुझ्या नृत्याचा उल्लास सदाबहार
वृक्ष वेलींच्या माथ्यावर
बरसणारया ढगांवर
सुकदुकीचा सदा विसर


अनुभूतीचे सारे थर
पृथ्वी आकाश पाताळ
अस्तित्वाच्या पार
तुझी सय अपरंपार


अनादी अंत महोत्सव
आनंदाचा गजर गजर
आनंदी आनंद आनंदी आनंद
आनंदी आनंद आनंदी आनंद...

* * *
"सुकदुक" (कोंकणी), सुख दुःख
- - - - - -
स्थळ: मुंबई
काळ: २८ - - १९९९
- - - - - -
धरतरी झाली माझे माता पिता गुरु.
--- रेमी डिसोजा
गुरु पौर्णिमा (१८..२००८)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 03, 2009

लोकगीतांचा मागोवा-२: लोककला आणि अभिजात कला शैली

१.
पंडित कुमार गंधर्व यांची स्फूर्तीदायक आठवण मनात नेहमीच ताजी असते. पंडितजीना त्यांच्या शास्त्रक्रियेनंतर काही वर्षे गायचे नाही असे सक्तीचे पथ्य पलावे लागले. त्या पथ्याच्या काळात ते माळव्यात खेडोपाडीफिरले व अनेक लोकगीते ऐकली - जमा केली.
आणि समकालीन अभिजात संगीताने पंडितजींच्या हिंदुस्थानी गायकीचा नवा आविष्कार अनुभवला. लोक-गीत-संगीताने पुन्हा एकदा अभिजात कलाशैलीत नव्याने पदार्पण केले. (अधिक वाचा: Masters of Timeless Architecture)    

लोकगीते - सर्वच लोककला - यांच्यात अभिजात कलाशैलींचा उगम आहे हे सर्वमान्य आहेच. पण विसाव्या - एकविसाव्या शतकांत असे क्वासिताच घडते. (बॉलीवुड सिनेमाबद्दल न बोललेले बरे.) 

आर्किटेक्चर (वास्तुविद्या किंवा वास्तुउद्योग) [टीप १] या क्षेत्रात शंकर निवृति कानडे, आर्किटेक्ट (वास्तुविद), आता बंगळूर निवासी, याने या क्षेत्रात लोककलेचे अभिजात वास्तुमध्ये परिवर्तन केले. त्याने संशोधित केलेले बांधकाम "छापडी" पध्दति या स्थानिक भाषेतील नावाने कर्नाटकात ओळखली जाते.

माझा लहानपणापासून अनुसूचित जाती-जमातिंशी -- धनगर, महार, चांभार, कोष्टी, कुंभार, सुतार, गवंडी, सोनार, लोहार, इ. --  संपर्क आला. यानंतरच्या काळात कातकरी, ठाकर, वारली, डांगी, भिल्लांच्या वेगवेगळ्या जमातीं मध्ये वेळोवेळी सुमारे तीस वर्षे फिरलो- राहिलो. या काळात त्यांची वास्तु व जीवन शैली पाहिली. त्याचा प्राथमिक आढावा मी "Tribal Housing: Buddha and the Art and Science of Karavi Hut" या संशोधित निबंधात घेतलेला आहे. मी वास्तुमध्ये कोणतीही क्रांति केलेली नाही. मात्र अनेक वर्षांच्या संपर्काने माझी जीवन शैली मात्र बदलली.  
*   *   *

टीप १:  इथे आर्किटेक्चर याचा संदर्भ पाश्चिमात्य पध्दतिशी आहे. जो फरक एलॉपथी व आयुर्वेद यात आहे तसाच आर्किटेक्चर व इंडियन वास्तुशिल्प यात आहे. अर्थात दोनही "वास्तु" आहेत. आधुनिक विलायती वास्तुचा उगम औद्योगिक क्रांतिमध्ये आहे. आणि त्याची मुळें ग्रीक व रोमन वास्तुमध्ये आहेत. इंडियात आलेले आधुनिक आर्किटेक्चर म्हणजे विलायती आधुनिक वास्तुच्या  पुच्छाचे टोकच म्हणा ना. 
गेल्या दशकाच्या काळात आर्किटेक्चर म्हणजे सृजनशील उद्योग (creative industry ) समजले जाते. त्यामुळे त्याला वास्तुशिल्प किंवा वास्तुकला म्हणने आतातरी योग्य ठरणार नाही.  

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape